ट्रॅक्टर मोर्चाला दिल्लीत हिंसक वळण

0
101

>> अनेक ठिकाणी हिंसाचार, पोलीस-आंदोलकांत चकमक

कृषी कायद्यांविरोधात काल शेतकर्‍यांनी दिल्लीत काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात शेतकर्‍यांवर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तर काही ठिकाणी लाठीमार करावा लागला. यावेळी काही शेतकर्‍यांनी तलवारी घेऊन पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. या घटनांत दोन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस जखमी झाले आहेत. मोर्चाला लागलेले हिंसक वळण पाहून मोर्चा मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे.

शेतकर्‍यांनी काल काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. नियोजित मार्ग सोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांची पोलिसांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली. यावेळी पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला. यावेळी झालेल्या हिंसाचारात बसेस आणि पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.

८३ पोलीस जखमी
दरम्यान, या ट्रॅक्टर मोर्चादरम्यानच्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यामध्ये ८३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारप्रकरणी आणखीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पूर्व दिल्लीमध्ये मोर्चादरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आठ बस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच आंदोलक शेतकर्‍यांनी केलेल्या हल्ल्यात ८३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.