ट्रकच्या धडकेत वडील ठार; मुलगा जखमी

0
4

>> पिळये-धारबांदोडा येथील घटना; ट्रकचालकास अटक

पिळये-धारबांदोडा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयासमोर बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास खडीवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सुभेलाल जकसिंग (रा. कसल्ले-पिळये) या दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा साईश जकसिंग (9) आणि धर्मेंदर नामक एक कामगार गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या साईश याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रकचालकास फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर माहितीनुसार, जीए-05-टी-1390 क्रमांकाचा खडीवाहू ट्रक तिस्क-उसगाव येथून पिळये येथे जात होता. सरकारी प्राथमिक विद्यालयासमोरील अरुंद रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए-05-क्यू-1170 क्रमांकाच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. त्यात दुचाकीवरील तिघे जण रस्त्यावर कोसळले. त्यानंतर दुचाकीचालक सुभेलाल जकसिंग यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने पोलीस स्थानकात शरण आला. ट्रकचालक वैकुंठ निळकंठ नाईक (54, रा. तिराळ-उसगाव) याला अटक करण्यात आली आहे. निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत तळकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.