- डॉ. आरती दिनकर
होमिओपॅथी तज्ज्ञ. समुपदेशक टॉन्सिलायटीस हा गोवर वगैरे अनेक प्रकारच्या स्फोटक किंवा विषारी ज्वरात उद्भवतो. परंतु अनेकदा स्वतंत्रपणे वारंवार होणारी थंडी वगैरे कारणांनीही होतो. कधीकधी साथीनेही हा रोग होतो.
एकदा माझ्या क्लिनिकमध्ये एक बारा वर्षाची मुलगी तापाने फणफणलेली, अगदी लाल झालेली, गळून गेलेली इशा तिच्या आईबरोबर आली. या मुलीला ऍक्युट टॉन्सिलायटीस (शीघ्र कालीन उपजिह्वापिंड दाह) झालेला दिसून आला. टॉन्सिल्स व त्या शेजारच्या घशाची कमान व पडजीभ वगैरे भाग फार लाल व सुजलेले दिसून आले. मानेचे पिंड अतिशय दुखत होते व मोठे झालेले आढळले. त्यामुळे तिला तोंडसुद्धा उघडता येत नव्हते. गिळताना घशात व कानात दुखत होते. ताप १०३ डिग्री होता. मी तिला आठ दिवसांच्या औषध दिले व आठ दिवसांनी भेटण्यास सांगितले.
ईशा आठ दिवसांनी आली तेव्हा घशाच्या कमानी, पडजीभ वगैरे भागाचा लालसरपणा बराचसा कमी झालेला आढळला. नंतर होमिओपॅथिक औषधांची मात्रा कमी केली. औषधयोजना बरोबर होती त्यामुळे बदलले नाही. यानंतर मात्र ज्या ज्या वेळेस इशा आली त्यावेळेस तिच्या रोगाची तीव्रता कमी झालेली दिसली. अशाप्रकारे होमिओपॅथिक औषधांनी त्या मुलीचा टॉन्सिलचा त्रास कायमचा थांबला.
टॉन्सिलायटीस हा गोवर वगैरे अनेक प्रकारच्या स्फोटक किंवा विषारी ज्वरात उद्भवतो. परंतु अनेकदा स्वतंत्रपणे वारंवार होणारी थंडी वगैरे कारणांनीही होतो. कधीकधी साथीनेही हा रोग होतो. पडजीभ लाल सुजलेली दिसते. जबड्याचे व मानेचे पिंड मोठे होतात व दुखतात. दुखल्यामुळे तोंड उघडता येत नाही. गिळताना घशात कानात दुखते. ताप येतो तेव्हा १०३- १०४ फॅ पर्यंत जातो. श्वासात दुर्गंधी असते. टॉन्सिल्सवर प्रथम लहान लहान पांढरे ठिपके दिसतात पुढे ते एकात एक मिसळून पिंडावर थर जमतो. यावरून हा घटसर्पाचा थर नाही हे ओळखता येते. हा थर निघाला म्हणजे खाली खोल खड्डे पडतात. क्वचितच पिंडा मध्ये पू होतो. त्यामुळेच ते फार मोठे व लिबलिबीत होतात त्यामुळेच श्वासोच्छवास घेता येत नाही. जिभेवर किटण असून जिभेचा शेंडा, कडा लाल असतात. या सगळ्या लक्षणांवर योग्य वेळी होमिओपॅथीचे औषध घेतल्यास मुलांना, मोठ्या माणसांना हा त्रास होणार नाही.