– श्रद्धानंद वळवईकर
जागतिक दर्जाचा विश्व क्रमांक दोन नोव्हाक जोकोव्हिक या टेनिसपटूने सर्व भारतीयांचे लक्ष सध्या वेधून घेतले आहे. प्रतिष्ठेच्या डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेत यजमान भारत आणि सर्बिया या उभय देशांतर्गत दि. १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान अतिमहत्त्वाची निर्णायक लढत होणार आहे. या लढतीत सर्बियातर्फे स्टार खेळाडू जोकोव्हिकच्या खेळण्यासंबंधी अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसले तरी बेंगलूरच्या कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या टेनिस स्टडियमवर रंगणार्या या निर्णायक फेरीत सध्या हा सर्बियन स्टार रसिकांच्या केंद्रस्थानी आहे.
जोकोव्हिक खेळला तर त्याच्या जोडीनेच अन्य एक दमदार टेनिसपटू झिमोन्जिक यांच्या दर्जेदार खेळापुढे टेनिस इंडियाला निश्चितच संघर्ष करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या लढतीत जिंकणारा संघ सरळ २०१५ सालच्या डेव्हीस करंडक विश्व गट फेरीसाठी पात्रता गाठणार आहे. ऑल इंडिया टेनिस फेडरेशनचे सरचिटणीस भारत ओझा याना या लढतीची प्रतीक्षा असून भारतीय स्टार लियांडर पेस व महेश भूपती यांच्या अनुपस्थितीतही टेनिस इंडियाकडून चमत्कारीक विजयाची त्याना अपेक्षा आहे.
डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेअंतर्गत उभय देशात यापूर्वी दोनदा सामना झालेला असून भारत-सर्बिया यांनी प्रत्येकी एकदा प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन केला आहे तर डेव्हीस चषक स्पर्धेच्या एकूण इतिहासात भारताने १९६६, १९७४ व १९८७ या साली उपविजेतेपद पटकावले आहे. भारतीय टेनिसची हुकमी जोडी लियांडर पेस व महेश भूपती यानी राष्ट्रीय टेनिसला वैभवी कारकिर्द प्राप्त करून दिलेली असली तरी, स्वदेशाला डेव्हीस करंडक जिंकून देण्यात त्याना आजपर्यंत अपयश आले आहे. आगामी लढतीतही टेनिस इंडियाची ही बिनीची जोडी खेळणार नसल्याने युवा स्टार रोहन बोपण्णासह सोमदेव देववर्मन, युकी भांब्री, साकेत मिनेनी या युवा खेळाडूंवर देशी यश विसंबून आहे. सर्बियन स्टार जोकोव्हिक व झिमोन्झिक या जागतिक दर्जाच्या प्रभावी जोडीपुढे युवा भारतीय चौकडी कितपत यशस्वी होईल हा एक प्रश्नचिन्हच आहे.
माजी राष्ट्रीय टेनिसपटू झीशन अली हे विद्यमान राष्ट्रीय प्रशिक्षक असून नॉन प्लेईंग कप्तान आनंद अमृतराज यांच्या कुशल डावपेचांचा लाभ आगामी डेव्हीस चषक लढतीत टेनिस इंडियाला होणार आहे. डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेत यंदा टेनीस इंडिया जोरदार विजयी फॉर्ममध्ये खेळत असली तरी सर्बिया विरुध्दच्या आगामी लढतीत खेळाडूंच्या कौशल्याची खरी कसोटी लागेल. यंदा डेव्हीस चषकमधील प्राथमिक प्ले- ऑफ लढतीत टेनिस इंडियाने शानदार खेळ करून चीनी तायपेई आणि कोरिया प्रजासत्ताक यासारख्या झुंजार संघाला चकीत केले आहे. पहिल्या फेरीत चीनी तायपेई संघावर ५-० असा दणदणीत विजय संपादन केल्यानंतर पुढे परदेशी भूमीत बुसानमध्ये कोरिया प्रजासत्ताक संघाला ३-१ गेम्सनी मात देण्यात टेनिस इंडिया यशस्वी ठरली.
ऑल इंडिया टेनिस फेडरेशनने (एआयटीएफ) पूर्व नियोजनाने सर्बियाविरुध्दच्या निर्णायक फेरीसाठी पाच महिन्यांपूर्वीच बेंगलूर येथील कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या टेनिस स्टेडियमला पसंती दर्शविली आहे. उभय संघातील घेळाडूंना बिनतोड सर्व्हिसच्या (एस) बळावर आपल्या सर्व्हिसवर प्रभुत्व राखण्याची उत्तम संधी या हार्ड कोर्टवर मिळेल, अशी आशा आहे.
जागतिक टेनिसमध्ये सर्बियाला प्रतिष्ठीत संघात स्थान प्राप्त असून सहावेळचा ग्रॅन्डस्लॅम किताब विजेता आणि जागतिक द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोव्हिक याचा अंतिम संघातील समावेश अजूनही अनिश्चित मानण्यात येत असला तरी भारतीय आव्हान सहजरीत्या झेलण्याची क्षमता या सामर्थ्यशाली टेनिसपटूत आहे. भारताचे हुकमी टेनिसपटू लियांडर पेस आणि महेश भूपती यांच्या अनुपस्थितीत टेनिस इंडियाला प्रबळ सर्बियाचा सामना करावा लागणार आहे. नॉन प्लेईंग कप्तान आनंद अमृतराज आणि प्रशिक्षन झिशन अली हे अनुभवसंपन्न असले तरी पेस भूपती या दुक्कलीची बरोबरी करू शकणारे खेळाडू विद्यमान टेनिस इंडियाकडे नाहीत. रोहन बोपण्णा अनुभवी असला तरी सोमदेव देववर्मन व युकी भांब्री यांच्या खेळात सातत्याचा अभाव जाणवतो. टेनिस इंडियाचा सर्वांत युवा सदस्य साकेत मिनेनी हा अननुभवी असल्याने टीम इंडिया टेनिसपुढील लक्ष्य आव्हानात्मक आहे.
गेल्या वर्षी (२०१३) सर्बियाने डेव्हीस चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले होते. या संघाची गेल्या सात वर्षांची डेव्हीस चषक कारकिर्द लक्षणीय असून याचे बरेचसे श्रेय त्यांचा जागतिक दर्जाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिक तसेच अन्य स्टार खेळाडू झिमोन्जिक यांना प्राप्त व्हावे. त्यांचा नॉन प्लेईंग कप्तान बोग्दान ओब्रादेव्हिक यांचे डावपेचात्मक कौशल्यही येथे प्रभावशाली ठरले आहे.
सर्बियाविरुध्दची लढत जिंकल्यास भारताला डेव्हीस चषक स्पर्धेच्या मुख्य प्रवाहात परतण्याची उत्तम संधी मिळेल. उभय संघातील विजयी संघ २०१५ सालच्या विश्व गट स्पर्धेसाठी सरळ पात्रता गाठणार आहे. मात्र, पराभूत संघास विभागीय गट स्पर्धेत स्पर्धा करावी लागेल. टेनिस इंडिया २०१२ व २०१३ साली आशियाई ओशेनिया गट एक स्पर्धेत खेळलेला आहे आणि यंदा सर्बियावर थरारक विजय संपादन करू शकल्यास तीन वर्षांच्या कालखंडाअंती आपला संघ स्पर्धेच्या मुख्य प्रवाहात खेळण्याची पात्रता गाठू शकेल.
सोमदेव देववर्मन
टेनिस इंडिया चमूचा अल्पसा परिचय : व्यावसायिक टेनिसपटू नवी दिल्लीतील २०१० सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांत सुवर्णपदक २०१० सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांत एकेरीचे सुवर्ण आणि सांघिक कांस्यपदक. २००३ साली चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरीसह अंतिम फेरीत धडक. २०११ सालचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार विजेता. जागतिक टेनिसमध्ये सनसनाटंी विजय संपादन करण्याची क्षमता असलेल्या या टेनिसपटूत विजयी सातत्याचा अभाव जाणवतो. पेस-भूपती यांच्या अनुपस्थितीत टेनिस इंडियाचा मुख्य भार यांच्यावरच आहे. वैयक्तिक प्रशिक्षक स्कॉट मॅक्कैन यांच्या कुशल मार्गदर्शनाचा कारकीर्दीत उत्तम लाभ झालाय. सर्बिया विरुध्द एकेरीत कसोटीचा काळ.
रोहन बोपण्णा
व्यावसायिक टेनिसपटू. वेगवान सर्व्हिस करण्याची खेळक्षमता. पेस भूपती नंतरचा संघातील सर्वांत अनुभवी टेनिसपटू. २००२ सालापासून राष्ट्रीय सर्वांत अनुभवी टेनिसपटू. २००२ सालापासून राष्ट्रीय टेनिस चमूचा मुख्य घटक. आवश्यक प्रसंगी सर्वोत्तम खेळ करून सामन्याचे पारडे फिरविण्याची क्षमता. दुहेरीचा तज्ज्ञ खेळाडू. जागतिक दुहेरी मानांकनात १७ व्या स्थानी भारतीय टेनिसमधील अनेक सनसनाटी विजयांचा शिलेदार. सर्बियाविरुध्दही अशाच सनसनाटी खेळप्रदर्शनाची अपेक्षा.
युकी भांब्री
२०१० सालच्या सिंगापूर येथील युवा ऑलिंपिक क्रीडामहोत्सवातील रौप्यपदक विजेता. २००८ सालच्या राष्ट्रकुल (युवा स्पर्धा) क्रीडास्पर्धांत रौप्यपदक व सांघिक कांस्य. कनिष्ठ वर्गात माजी क्रमांक एकचा खेळाडू. २००३ सालचा कनिष्ठांच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस विजेता. प्रशिक्षक आदित्य सचदेवच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल. उज्ज्वल भवितव्याचा खेळाडू.
साकेत मिनेनी
संघातील युवा तथा अननुभवी टेनिसपटू. एकेरी आणि दुहरेतून एटीची टूर टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीची नोंद करून राष्ट्रीय चमूत प्रवेश. टेनिस खेळातून डबल हॅन्डेड फटक्यावर विशेष प्रभुत्व. प्रशिक्षक जेमन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली एकेरीतून नऊ तर दुहेरीतून दहा विजयी किताबांची नोंद. उज्ज्वल भवितव्य लाभलेला परिश्रमी टेनिसपटू.
आनंद अमृतराज
नॉन प्लेईंग कप्तान : भारताने निर्मिलेला सर्वोत्तम टेनिसपटू. माजी खेळाडू असल्याने डावपेचात्मक कौशल्यात वाक्बगार. स्पर्धात्मक टेनिसनंतर टेनिस प्रशिक्षणाकडे व्यावसायिक कल दिल्याने टेनिस इंडियाला भविष्यातही प्रतिभाशाली टेनिसपटूंच्या स्वरुपात पुरवठा शक्य. तूर्त सर्बिया विरुध्दच्या महत्वपूर्ण लढतीसाठी परिणामकारक डावपेच आखण्याकडे लक्ष.
झिशन अली (प्रशिक्षक)
नामवंत राष्ट्रीय टेनिसपटू रमेश कृष्णनचा एकेकाळचा विश्वासू साथीदार डेव्हीस चषक टेनिस स्पर्धांच्या इहिातसात कृष्णन झिशन जोडीने पुरुष दुहेरीतून काही नाट्यमय विजयांची नोंद केली आहे. सर्बियाविरुध्दच्या लढतीत प्रशिक्षण कौशल्याची खरी कसोटी.