टॅक्सीवाल्यांचा उद्याचा संप बेकायदा ः वाहतूकमंत्री

0
108

>> संप मागे न घेतल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा

राज्यातील टॅक्सीचालकांनी येत्या १९ रोजी आयोजित केलेला संप हा बेकायदेशीर असून तो नियोजित संप मागे घेण्यात यावा. अन्यथा टॅक्सीवाल्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. संपाच्या वेळी हिंसा करण्याचा अथवा रस्ते अडवण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध पोलीसी बळाचा वापर करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता हा संप आयोजित करण्यात आला आहे. या संपामुळे रोज शेकडोंच्या संख्येने गोव्यात येणार्‍या पर्यटकांची प्रचंड गैरसोय होऊ शकते. मात्र, ती होऊ नये यासाठी सरकार सर्व ती पावले उचलणार असल्याचे सांगून राज्यभरात पर्यटकांच्या सोयीसाठी सुमारे ३५० अतिरिक्त बसेसची सोय करण्यात येईल. तसेच लोकांना त्यांच्या खासगी चारचाकी गाड्या या दिवशी टॅक्सी म्हणून वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक खात्याने तसा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

कायदा हातात घेणे
खपवून घेणार नाही
संपाच्या दिवशी रस्ते अडवणे, जमाव करून हिंसा करणे, कायदा हातात घेणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्पीड गर्व्हर्नर्सचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्याने त्याबाबतीत सूट देता येणार नसल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले. स्पीड गव्हर्नन्सबाबत टॅक्सीवाल्यांना गेली दोन वर्षे सूट देण्यात आली. पण आता त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

…तर योजनांबाबत फेरविचार
वाहतूक खाते टॅक्सीवाल्यांना त्यांच्या १५ वर्षांच्या जुन्या टॅक्सी बदलून नव्या टॅक्सी घेण्यासाठी त्यांना एक लाख रु. पर्यंत अनुदान देत असते. एवढेच नव्हे तर टॅक्सीच्या विम्याचा हप्ताही वाहतूक खाते भरत असते. वाहतूक खात्याच्या विनंतीला मान देऊन जर या टॅक्सीचालकांनी आपला नियोजित संप मागे घेतला नाही तर त्यांना यापुढे या योजनांचा लाभ वाहतूक खाते देणार नसल्याचे ढवळीकर म्हणाले.
पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी यावेळी बोलताना कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नसून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद गावस व उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षक चंदन चौधरी हेही उपस्थित होते.

डिजिटल मीटर्स व स्पीड
गव्हर्नर ः आणखी सूट अशक्य
डिजिटल मीटर्स व स्पीड गव्हर्नर याबाबात वाहतूक खात्याने राज्यातील टॅक्सीवाल्यांना आतापर्यंत बरीच सूट दिलेली आहे. पण यापुढे आणखी सूट देणे शक्य नाही. केंद्र सरकारने जो नवा मोटर वाहन कायदा केलेला आहे त्या कायद्यात डिजिटल मीटर्स व स्पीड गव्हर्नर या गोष्टींची सक्ती करण्यात आलेली आहे. या दोन्हीबाबत टॅक्सीवाल्यांना बराच काळ सूट देण्यात आली. मात्र, आता तसे करता येणार नसल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. डिजिटल मीटर्स बसवण्यासाठी टॅक्सीवाल्यांना वाहतूक खात्यातर्फे पैसे देण्यात येणार असून नंतर ते हप्त्याहप्त्यांनी वसूल करून घेण्यात येणार आहेत.

टॅक्सी मालक संघटनांचा
उद्या बंदचा निर्णय

उत्तर व दक्षिण गोवा टॅक्सी मालक संघटनेने उद्या १९ रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तर गोवा टॅक्सीमालक संघटनेचे अध्यक्ष वासुदेव आर्लेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत राज्यभरातील टॅक्सीसेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

सरकारने टॅक्सींवर स्पीड गव्हर्नर बसवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे. हा स्पीड गव्हर्नर बसवल्यानंतर आम्हाला ८० च्या वर वेगाने गाडी हाकता येणार नसल्याने धंद्यावर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. पर्यटकांना रेल्वेगाड्या, विमाने चुकू नयेत यासाठी टॅक्सी वेगाने हाकाव्या लागतात. त्यांचीच तशी मागणी असते. मात्र, स्पीड गव्हर्नर बसवल्यानंतर टॅक्सी वेगाने हाकता येणार नसल्याने धंद्यावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

अधिकार्‍यांकडून छळ
वाहतूक खात्यातील अधिकारी वाहतूक परवान्यांचे नूतनीकरण करताना छळ करीत असल्याचीही आमची तक्रार आहे, असे ते म्हणाले.
कुठल्याही राज्यात टॅक्सीवाल्यांना अजून स्पीड गव्हर्नरची सक्ती करण्यात आलेली नाही. गोव्यातच ती का केली जाते असा सवाल त्यांनी केला.