टॅक्सीमीटर प्रश्‍नावर गणेशोत्सवापूर्वी तोडगा

0
31

>> मंत्री मायकल लोबो यांची माहिती

राज्यातील टॅक्सींच्या मीटरचा प्रश्‍न हा येत्या गणेश चतुर्थीपूर्वी मार्गी लागणार असल्याची माहिती काल बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही राज्यातील टॅक्सी व्यवसायिकांचा प्रश्‍न मांडला होता व प्रामुख्याने त्यात टॅक्सी मीटरला त्यांचा विरोध असल्याची बाब मुख्यमंत्री व वाहतूकमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली होती, असे लोबो म्हणाले. राज्यातील टॅक्सीवाल्यांना सरकारने सांभाळून घेण्याची गरज आहे, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांनी येत्या चतुर्थीपर्यंत टॅक्सीमीटरचा प्रश्‍न निकाली काढला जाणार असल्याचे आश्‍वासन दिल्याचे लोबो म्हणाले. टॅक्सीवाल्यांनी ऍपधारीत टॅक्सीसेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यांचा टॅक्सीमीटरला विरोध असल्याचे गुदिन्हो म्हणाले.

शॅक्सवाल्यांनाही दिलासा देणार
दरम्यान पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी शॅक्स व्यावसायिकांचे शॅक्स परवाना शुल्क कपातीची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे लोबो यांनी सांगितले. शॅक्सवाल्यांनी गेल्यावर्षी ५० टक्के परवाना शुल्क भरून नोव्हेंबरमध्ये शॅक्स सुरू केले होते. मात्र, व्यवसाय फेब्रुवारीमध्ये मंदावला आणि मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. त्यामुळे यंदा शॅक्स परवाना शुल्क २५ टक्क्यांवर आणावे, अशी मागणी आजगावकर यांनी केली.