टॅक्सीचालकांचे वास्कोत ठिय्या आंदोलन

0
128

गोवा सरकारने पर्यटन खात्यातर्फे कालपासून सुरू केलेल्या टॅक्सी ऍप सेवेला गोवा पर्यटक टॅक्सी चालक संघटनेने दाबोळी विमानतळावर ठिय्या आंदोलन करून विरोध केला. दक्षिण जिल्हा टॅक्सी मालक संघटना तसेच गोवा पर्यटक टॅक्सी चालक संघटनेचे सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.

दाबोळी विमानतळावर ऍप टॅक्सी सेवेला बावटा दाखवून संध्याकाळी सुरुवात करण्यात येणार असल्याचे समजताच पिवळ्या काळ्या टॅक्सी संघटनेने विरोध दर्शविण्यासाठी दाबोळी विमानतळ परिसरात पार्किंग ठिकाणी रस्त्यावरच बस्तान ठोकून वाहतूक रोखली. सुमारे तासभर वाहतूक रोखल्याने गोंधळ माजला. उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी टॅक्सीवाल्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता तो व्यर्थ ठरला. या गोंधळामुळे या सेवेच्या शुभारंभ कार्यक्रम लांबला. शेवटी विरोध करणार्‍या टॅक्सी चालकांना गराडा घालून ऍप टॅक्सी सेवेचे आयोजक, पर्यटन खात्याचे अधिकारी, दाबोळी विमानतळाचे संचालक नेगी यांच्या हस्ते बावटा दाखवून सेवेला सुरुवात केली. अवघ्या दोन मिनिटात कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.
ऍप टॅक्सी सेवेच्या शुभारंभावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा दाबोळी विमानतळावर तैनात करण्यात आला होता. आंदोलक टॅक्सी चालकांसभोवताली पोलीस गस्त ठेवण्यात आली होती. कडक पोलीस बंदोबस्तात ‘टॅक्सी ऍप’ सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

दरम्यान, याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना काळ्या पिवळ्या टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी राज्यात टॅक्सी ऍप सेवा सुरू केल्यास पर्यटक टॅक्सी चालकांवर उपासमारीची पाळी येणार असल्याचे सांगितले. सरकारने त्वरित लक्ष घालून ही सेवा मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.