टॅक्सीचालकांची दादागिरी खपवून घेणार नाही

0
11

>> मुख्यमंत्र्यांचा इशारा; जहाजावरील विदेशी पर्यटकांना आणण्यासाठी जाणार्‍या बस रोखण्याचा प्रकार

वास्को येथे मुरगाव बंदरात जहाजामधून उतरलेल्या विदेशी पर्यटकांना आणण्यासाठी जाणार्‍या पर्यटक बस अडविण्याचा प्रकार गंभीर असून, सरकारकडून टॅक्सीचालकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. या गैरप्रकारांची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. बसचालकाला मारहाण झाली असेल, तर संबंधित टॅक्सीचालकाला अटक केली जाईल. पर्यटकांना ठराविक वाहनात बसण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल स्पष्ट केले.

पर्यटन विकास महामंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत पर्यटनस्नेही नर्णय घेण्यात आले. तसेच आगामी काळात आवश्यक साधनसुविधा उभारण्यावर चर्चा करण्यात आली, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. बेकायदा हॉटेल, जलक्रीडा, डान्स बारवर कारवाईची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून मुरगाव बंदरात पर्यटन काउंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. मुरगाव बंदरात पर्यटकांना अडविण्याचा प्रकार गंभीर असून, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चांगल्या पर्यटकांची गोव्याला नितांत गरज आहे, असेही खंवटे म्हणाले.

त्या दिवशी नेमके काय घडले?
ख् मुरगाव बंदरात जहाजाने आलेल्या अमेरिकन पर्यटकांना आणण्यासाठी गेलेल्या बसगाड्यांमध्ये त्या पर्यटकांना बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांना बसऐवजी टॅक्सी वापरण्याचा आग्रह धरण्यात आला. हा प्रकार बुधवारी घडला होता.

ख् टूर ऑपरेटरच्या तक्रारीनुसार टॅक्सीचालकांनी बसवर दगडफेक करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पर्यटक घाबरले आणि त्यांनी गोवा दर्शन टाळून जहाजावर परतणे पसंत केले.

ख् स्थानिक प्रेक्षणीय स्थळांच्या पॅकेजसाठी पर्यटकांकडून घेतलेली रक्कम परत करणे भाग पडल्याने टूर ऑपरेटरला नुकसान झाले. अशा प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात गोव्याचे नाव बदनाम होईल, अशी भीती टूर ऑपरेटरने व्यक्त केली.