कमी कालावधीच्या अधिवेशनावरून विरोधकांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

0
17

>> विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ४ दिवस

गोवा विधानसभेचे चार दिवसीय हिवाळी अधिवेशन येत्या १६ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान घेण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे अभिभाषण होणार आहे. या हिवाळी अधिवेशनासंबंधी आदेश काल जारी करण्यात आला; मात्र कमी कालावधीच्या अधिवेशनावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

युरी आलेमाव यांनी गोवा विधानसभेचे चार दिवसांचे हिवाळी अधिवेशन बोलाविण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. अधिवेशनाचे एकूण चार दिवस असले, तरी पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण असल्याने कामकाज केवळ ३ दिवस होणार आहे. आता या वेळेस सरकार विरोधकांना घाबरले आहे का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

सभासदांचा खासगी कामकाजाचा दिवस रद्द करण्याची कृती अयोग्य आहे. सभासदांचा खासगी ठराव मांडण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. सरकार विरोधी पक्षांना विश्‍वासात घेत नाही. सभापतींकडे कामकाज सल्लागार समितीची बैठक त्वरित बोलाविण्याची विनंती केली जाईल, असे विजय सरदेसाईंनी सांगितले.