>> नवदीप सैनी, रवींद्र जडेजाला वगळले
>> विराट कोहलीला विश्रांती
बांगलादेशविरुद्ध ३ नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणार्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी काल गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली.
टी-ट्वेंटीसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देत, रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. याचसोबत स्थानिक क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी करणारा केरळचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही संघात स्थान देण्यात आले आहे. तब्बल चार वर्षांनंतर संजू संघात परतला आहे. २०१५ साली जुलै महिन्यात संजूने आपला एकमेव टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे याला हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीचा लाभ झाला आहे.
महेंद्रसिंग धोनीचादेखील विचार करण्यात आलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत (इंदूर १४ ते १८ नोव्हेंबर व कोलकाता २२ ते २६ नोव्हेंबर) मात्र कोहली खेळणार आहे. रांची कसोटीत झकास कामगिरी करूनही शहाबाज नदीम याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. चायनामन कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही टी-ट्वेंटीसाठी अष्टपैलू रवींद्र जडेजाला डच्चू देण्यात आला आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहल संघात परतला आहे. युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला वगळण्यामागील कारण मात्र समजू शकले नाही.
भारत कसोटी ः विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुभमन गिल व ऋषभ पंत.