टीम इंडिया विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार?

0
117

>> बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध आज सामना

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत आज गुरुवारी भारत व न्यूझीलंड या तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार आहे. मागील वेळेच्या विश्‍वचषक स्पर्धेत भारताने किवी संघाला दणका देत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. यावेळीसुद्धा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास सज्ज झाली आहे.
यंदाच्या स्पर्धेत भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली आहे. पहिल्या लढतीत विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केल्यानंतर दुसर्‍या लढतीत भारताने बांगलादेशला १८ धावांनी पराजित करत आपली विजयी मालिका कायम राखली होती. या विजयासह भारताने क्रिकेटच्या या प्रकारातील आघाडीच्या चार संघांचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात ४ गुणांसह पहिले स्थान मिळविले होते. त्यामुळे आजचा विजय ‘ग्रुप ऑफ डेथ’ मानल्या जाणार्‍या या गटातून टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की करू शकतो.

आयसीसी क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा वरच्या स्थानी आहे. मागील ९ टी-ट्वेंटी लढतींत त्यांनी केवळ एकच पराभव स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांचा फॉर्म पाहता टीम इंडियाला सोपे जाणार नाही. परंतु, अव्वल क्रमांकावरील कांगारूंविरुद्ध केलेल्या खेळामुळे टीम इंडियाचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावलेला असून आजचा सामना रंगतदार होणे अपेक्षित आहे.

भारताविरुद्ध जय-पराजयाचा रेकॉर्ड पाहिल्यास न्यूझीलंडचा संघ सरस ठरतो. वर्षभरापूर्वी मायदेशातील टी-ट्वेंटी मालिकेत त्यांनी भारताला ३-० असे लोळविले होते. २०१८ साली झालेल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकात मात्र भारतीय संघ वरचढ ठरला होता. हरमनप्रीत कौरच्या झंझावाती १०३ धावांची बळावर भारताने किवी संघाला ३४ धावांनी हरविले होते. सलामीच्या लढतीत मिळालेल्या या यशामुळे भारताने गटात अपराजित राहत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

सध्या प्रगतीपथावर असलेल्या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही लढतीत गोलंदाजांनी टिच्चून मारा केला होता. त्यामुळे विशाल लक्ष्य उभारण्यात फलंदाजांना आलेले अपयश नजरेत भरले नव्हते. न्यूझीलंडविरुद्ध मात्र गाफिल राहून चालणारे नाही. फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल.

१६ वर्षीय सलामीवीर शफाली वर्माने बांगलादेशविरुद्ध १७ चेंडूंत ३९ व ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ धावांची खेळी साकारली होती. तिसर्‍या स्थानावरील जेमिमा रॉड्रिगीसने २६ व ३४ धावा पहिल्या दोन लढतींत केल्या आहेत. चिंतेचा विषय आहे तो म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौरचे अपयश. बिग बॅशमध्ये खेळूनही तिला ऑस्ट्रेलियातील खेळपट्‌ट्यांशी जुळवून घेणे कठीण झाले आहे. चुकीच्या फटक्यांची निवडही तिच्या अपयशाचे कारण ठरले आहे. दीप्ती शर्मा व वेदा कृष्णमूर्ती यांनी आत्तापर्यंत आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. गोलंदाजी विभागात लेगस्पिनर पूनम यादवने २ सामन्यांत ७ बळी घेतले आहेत. पाच बळी घेतलेल्या स्विंग गोलंदाज शिखा पांडेची साथ तिला लाभली आहे.

न्यूझीलंड संघात टी-ट्वेंटीमधील सर्वांत स्फोटक असलेल्या सोफी डिव्हाईनचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग व न्यूझीलंडमधील देशांतर्गंत सुपर स्मॅश लीगमधील सर्वाधिक धावा डिव्हाईनच्या नावावर आहे. टी-ट्वेंटी क्रमवारीत प्रथम असलेल्या सुझी बेट्‌सला रोखण्याचे आव्हानही भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे. सध्याच्या घडीला सर्वांत वेगवान गोलंदाज असेलली लिया ताहुहू भारतीय आघाडी फळीला मारक ठरू शकते तर लेगस्पिनर अमेलिया केरविरुद्ध मोजूनमापून फटके भारताला खेळावे लागतील. शनिवारी झालेल्या स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीत न्यूझीलंडने श्रीलंकेला दयामाया दाखवली नव्हती. त्यांनी सात गड्यांनी हा सामना जिंकला होता. डिव्हाईनने ५५ चेंडूंत नाबाद ७५ धावांची शानदार खेळी या लढतीत केली होती. त्यामुळे सलग दुसरा विजय मिळविण्यासाठी न्यूझीलंडचा संघ आज मैदानात उतरणार आहे. त्यामुळे रोमांचक लढत अपेक्षित आहे.