टीम इंडिया वर्ल्ड कप विक्रमाच्या उंबरठ्यावर

0
112

आज आयर्लंडशी लढत
विश्‍व चषकातील विक्रमी विजयाच्या उंबरठ्यावरील टीम इंडियाची गाठ आज ब गट सामन्यात आयर्लंडशी पडेल.
चार दमदार विजयांसह उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या विजेत्या भारतीय संघाची नजर आज सलग पाचव्या विजयावर असेल. भारतीय संघ आज जिंकल्यास, २०११मधील स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुध्दच्या सामन्याने यशस्वी दौड सुरू केलेल्या विजेत्यांचा हा नववा विक्रमी विजय ठरेल.पर्थ येथील गेल्या सामन्यात वेस्ट इंडीजवर मात करीत धोनी आणि कंपनीने सौरव गांगुलीच्या संघाने २००३मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या विश्‍व चषकातील सलग आठ विजयांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.
भारतीय संघ आपली विजयी घोडदौड राखण्यास तर आयर्लंड उपउपांत्य फेरीसाठी ब गटात चौथे स्थान मिळविण्यास प्रयत्नशील असल्याने मुकाबला अटीतटीचा होईल. हा सामना गमावल्यास आयर्लंडला उपउपांत्य फेरीसाठी अखेरच्या लीग सामन्यात पाकिस्तानवर मात करावी लागेल.
गत विश्‍व चषकात बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडवर सफाईदार विजय मिळविला होता. युवराजने विजयात प्रमुख योगदान देताना पाच बळी आणि अर्धशतकही ठोकले होते. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत प्रभावी कामगिरीत चार सामन्यात ३७ बळी घेतले असून प्रतिस्पर्ध्यांना अडीचशेपर्यंत रोखलेले आहे. रविचंद्रन अश्‍विन आणि मोहम्मद शामीने प्रत्येकी प्रत्येकी ९ तर उमेश यादव, मोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी सहा बळी घेतले आहेत. संयुक्त अरब अमिरातविरुध्द खेळलेल्या भुवनेश्‍वरनेही एक बळी मिळविला आहे.
तथापि, ऑस्ट्रेलियातील मोठ्या स्टेडियमनंतर न्युझीलँडमधील छोटी सीमा रेषा असलेले स्टेडियम भारतीय फलंदाजांना निश्‍चितच अनुकूल ठरेल. क्युरेटर कार्ल जॉन्सन यांच्यामते खेळपट्टी फलंदाजांचे नंदनवन ठरेल.
तथापि, या मैदानावरील भारताचा ‘रेकॉर्ड’ चांगला नसून आतापर्यंतच आठ पैकी सहा सामन्यात हार पत्करावी लागलेली आहे.
इडी जॉयस, अँडी बलिर्बिनी, केवीन ओब्रायन आदि आयर्लंडचे फलंदाज बहरात आहेत.