
>> श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज
भारत व श्रीलंका यांच्यातीन तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळविला जाणार आहे. धरमशाला येथील पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेला श्रीलंकेचा संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे विजयासह मालिकेतील आव्हान कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्विंग होणार्या चेंडूंसमोर टीम इंडियाची तारांबळ उडाली होती. या पराभवातून टीम इंडियाने धसका घेतला आहे. मोहालीतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी किंवा ‘पाटा’ असण्याची अपेक्षा केली जात आहे. त्यामुळे श्रीलंकन गोलंदाजांना बळी मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर व मनीष पांडे या त्रिकुटापैकी एकाला वगळून मधल्या फळीत अजिंक्य रहाणेला संधी दिल्यास कठीण परिस्थितीत डाव उभारणीचे काम करताना त्याचा अनुभव कामी येऊ शकतो. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांना पहिल्या सामन्यात गोलंदाजी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला वगळून इतर कोणाला संधी देणे योग्य ठरणार नाही. दुसरीकडे विजयामुळे श्रीलंका संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. गोलंदाजांनी विजयाचा पाया रचल्यानंतर फलंदाजांनी त्यावर कळस चढविण्याचे काम पहिल्या सामन्यात केले होते. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. फलंदाजी विभागात लाहिरु थिरिमाने याची गच्छंती अटळ असून त्याच्या जागी सदीरा समरविक्रमा किंवा कुशल परेरा यापैकी एकाला संधी मिळणार आहे. धनंजय डीसिल्वा तंदुरुस्त ठरल्यास तिसर्या स्थानासाठी तो पहिली पसंती असेल. श्रीलंकेकडे गोलंदाजी विभागात असंख्य पर्याय असून एखाद्या गोलंदाजाविरुद्ध श्रीलंकेने आक्रमक पवित्रा अवलंबल्यास टीम इंडियाला एखाद्या गोलंदाजाची कमतरता भासू शकते.
भारत संभाव्य ः रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह.
श्रीलंका संभाव्य ः दनुष्का गुणथिलका, उपुल थरंगा, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, थिसारा परेरा, सचिथ पथिराना, अकिला धनंजया, नुवान प्रदीप व सुरंगा लकमल.