>> भारताचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय
अनुभवी लेगस्पिनर पूनम यादवने घेतलेले चार बळी व गोमंतकीय शिखा पांडेने ३ बळी घेत दिलेल्या तोलामोलाच्या साथीमुळे टीम इंडियाने टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत काल शुक्रवारी विजयी सलामी दिली. भारताने विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेले १३३ धावांचे आव्हान यजमानांना पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत ११५ धावांत संपला.
१३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पहिल्या पाच षटकांत ३० धावा जमवल्या. ऍलिसा हिलीने आक्रमकता दाखवत आपला फॉर्म परत मिळविला तर मूनीला धावा करण्यासाठी झगडावे लागले. पांडेने मूनीला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
कर्णधार मेग लेनिंग व राचेल हेन्स यांच्याकडून कांगारूंना खूप अपेक्षा होती. परंतु, ही अनुभवी जोडी अपेक्षांना पुरून उरू शकली नाही. सलामीवीर हिली दमदार अर्धशतकानंतर माघारी परतली. हिलीने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा केल्या. फिरकीपटू पूनम यादवने आपला अनुभव पणाला लावत दोन चेंडूत दोन बळी टिपले. तिने आधी राचेल हेन्सला (६) बाद केले. तर त्यानंतर दमदार फलंदाज एलिस पेरीला पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले. पण यष्टिरक्षक तानिया भाटियाने पुढील चेंडूवर कठीण झेल सोडल्याने तिला हॅट्ट्रिकला मुकावे लागले. पुढच्या षटकात पूनम यादवने चौथा बळी टिपला आणि ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. त्यानंतर यजमानांचे शेपूट अधिक वळवळले नाही. शेवटच्या दोन षटकांत त्यांनी तीन गडी गमावले व अखेर १९.५ षटकांत त्यांचा डाव भारताने ११५ धावांत संपवला. भारताकडून पूनम यादवने ४, शिखाने ३ तर गायकवाडने १ बळी टिपला.
तत्पूर्वी, स्मृती मंधाना व शफाली वर्मा यांनी केवळ ४.१ षटकांत संघाला ४१ धावांची खणखणीत सलामी दिली. स्मृतीला पायचीत करत जोनाथनने ही जोडी फोडली. हवेत फटके खेळत यजमान गोलंदाजांना हैराण केल्यानंतर शफाली तंबूत परतली. तिने केवळ १५ चेंडूंत २९ धावा कुटल्या. या दोघांसह हरमनप्रीत (२) परतल्याने टीम इंडियाची बिनबाद ४१ वरून ३ बाद ४७ अशी घसरगुंडी उडाली. या बळींमुळे संघाची धावगती मंदावली. एकवेळ १५०च्या आसपास संघ जाण्याची अपेक्षा होती. परंतु, कांगारूंच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. तीन बळी झटपट बाद झाल्याने जेमिमा रॉड्रिगीसने दीप्ती शर्मासोबत सावध खेळ केला. त्या दोघींनी डावाला आकार देताना चौथ्या गड्यासाठी ५३ धावा जोडल्या. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात अखेर रॉड्रिगीस माघारी परतली. तिने ३३ चेंडूत २६ धावा केल्या. दीप्ती शर्माने मात्र शेवटपर्यंत झुंज दिली आणि नाबाद ४९ धावांची खेळी केली.
धावफलक
भारत ः शफाली वर्मा झे. सदरलँड गो. पेरी २९ (१५ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), स्मृती मंधाना पायचीत गो. जोनासन १०, जेमिमा रॉड्रिगीस पायचीत गो. किमिन्स २६, हरमनप्रीत कौर यष्टिचीत हिली गो. जोनासन २, दीप्ती शर्मा नाबाद ४९ (४६ चेंडू, ३ चौकार), वेदा कृष्णमूर्ती नाबाद ९, अवांतर ७, एकूण २० षटकांत ४ बाद १३२
गोलंदाजी ः मोली स्ट्रानो २-०-१५-०, एलिस पेरी ३-०-१५-१, मेगन शूट ४-०-३५-०, जेस जोनासन ४-०-२४-२, डेलिसा किमिन्स ४-०-२४-१, ऍश्ले गार्डनर ३-०-१९-०
ऑस्ट्रेलिया ः ऍलिसा हिली झे. व गो. पूनम ५१ (३५ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), बेथ मूनी झे. गायकवाड गो. पांडे ६, मेग लेनिंग झे. भाटिया गो. गायकवाड ५, राशेल हेन्स यष्टिचीत भाटिया गो. पूनम ६, ऍश्ले गार्डनर झे. व गो. पांडे ३४, एलिस पेरी त्रि. गो. पूनम ०, जेस जोनासन झे. भाटिया गो. पूनम २, ऍनाबेल सदरलँड यष्टिचीत भाटिया गो. पांडे २, डेलिसा किमिन्स धावबाद ४, मोली स्ट्रेनो धावबाद २, मेगन शूट नाबाद १, अवांतर २, एकूण १९.५ षटकांत सर्वबाद ११५
गोलंदाजी ः दीप्ती शर्मा ४-०-१७-०, राजेश्वरी गायकवाड ४-०-३१-१, शिखा पांडे ३.५-०-१४-३, अरुंधती रेड्डी ४-०-३३-०, पूनम यादव ४-०-१९-४