बंगळुरू-एटीके लढत आज

0
187

इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर एटीके आणि बंगळुरू एफसी यांच्यात लढत होत आहे. गतविजेत्यांविरुद्ध दुहेरी वर्चस्वाच्या निर्धाराने एटीके खेळेल, तर बंगळुरू घरच्या मैदानावर सरस ठरण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे तीव्र चुरस अपेक्षित असेल.

डिसेंबरमधील लढतीत एटीकेने बंगळुरूला १-० असे हरविले होते. त्यावेळी एटीकेने सुरवातीपासून वर्चस्व राखले होते. दोन्ही संघांचे बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की झाले आहे. त्यामुळे दोन्ही प्रशिक्षक अनेक प्रमुख खेळाडूंनी विश्रांती देण्याची अपेक्षा आहे.बंगळुरूचा अलीकडील फॉर्म फारसा चांगला नाही. मागील दोन सामन्यांत ते चेन्नई आणि कोचीमध्ये केवळ एक गुण मिळवू शकले. त्यातच एएफसी करंडक पात्रता फेरीत मालदीवमध्ये त्यांना माझीयाविरुद्ध १-२ असे पराभूत व्हावे लागले. त्यात बाहेरील लढतीत (अवे मॅच) एक गोल करण्यात मात्र त्यांना यश आले.
बंगळुरूसाठी चांगली बाब म्हणजे सुनील छेत्री आणि जुआनन हे दोघे निलंबन संपल्यामुळे उपलब्ध आहेत. अल्बर्ट सेरॅन मात्र चौथ्या पिवळ्या कार्डमुळे खेळू शकणार नाही. एटीकेला मागील सामन्यात घरच्या मैदानावर चेन्नईन एफसीविरुद्ध १-३ असे पराभूत व्हावे लागले. बाद फेरीपूर्वी संघाला विजयी फॉर्म मिळावा अशी प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांची अपेक्षा असेल.

सेंटर-बॅक अनास एडाथोडीका मात्र मागील सामन्यातील दुखापतीमुळे सहा महिने खेळू शकणार नाही आणि एटीकेसाठी ही वाईट बातमी आहे. आक्रमक मध्यरक्षक जेव्हीयर हर्नांडेझ हा सुद्धा निलंबीत आहे. त्यामुळे डेव्हिड विल्यम्स याला सुरवातीपासून संधी मिळू शकते. एटीके बंगळुरूला घरच्या मैदानावरील दुसरा पराभव पत्करण्यास भाग पाडणार की बंगळुरू एटीकेचा धडाका रोखणार याची उत्सुकता असेल.