टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय

0
117

>> ‘सुपर ओव्हर’मध्ये न्यूझीलंडला नमविले; ‘हिटमॅन’ ठरला हीरो

रोमहर्षक झालेल्या ‘सुपर ओव्हर’मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडच्या तोंडातील घास काढून घेत तिसर्‍या टी-२०सह पाच लढतींच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

मोहम्मद शमीने भारताला सामना टाय करून दिल्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माने सुपर ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर खेचलेल्या उत्तुंग षटकारांमुळे भारताने अतिशय रोमहर्षक झालेला हा सामना जिंकत इतिहास रचताना न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-मालिका जिंकण्याचि किमया साधली. रोहितची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.

सामना टाय झाल्याने निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला होता. त्यात जसप्रीत बुमराहने टाकलेल्या षट्कांत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिल यांनी १७ धावा करीत भारताला विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य दिले. पहिल्या चार चेंडूवर ८ धावा निघाल्यानंतर शेवटच्या दोन चेंडूत टीम साऊदीला दोन खणखणीत षट्‌कार खेचत रोहित शर्माने टीम इंडियासाठी आकर्षक विजय सारारला.

तत्पूर्वी भारताकडून मिळालेल्या १८० धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघालाही ६ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावाच करता आल्याने सामना ‘टाय’ झाला होता. वास्तविक न्यूझीलंड हा सामना जिंकण्याच्या मार्गावर होता. कारण त्यांना शेवटच्या षट्कात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती आणि खेळपट्टीवर त्यांचे दोन हुकुमी फलंदाज कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलर होते. परंतु शमीने प्रथम विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना त्याने टेलरलाही बाद केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कर्णधार केन विल्यमसनची ८ चौकार व ६ षटकारांसह केलेली ४८ चेंडूतील लाजवाब ९५ धावांची अर्धशतकी खेळी वाया गेली. मार्टिन गप्टिलने ३१, रॉस टेलरने १७ तर कोलिन मुन्रोने १४ धावांचे योगदान दिले. भारताकडून शार्दुल ठाकुर व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २ तर युजवेंद्र चहल व रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत १७९ अशी धावसंख्या उभारली होती. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ९ षट्‌कांत ८९ धावांची सलामी दिली. राहुल २७ धावा करून परतला. लगेच ४० चेंडूत ६ चौकार व ३ षट्‌कारांसह ६५ धावांची अर्धशतकी खेळी केलेला रोहित हेमिश बेनेटच्या चेंडूवर टीम साऊदीकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर विराट कोहली ३८, श्रेयस अय्यर १७, मनीष पांडे नाबाद १४ व रवींद्र जडेजा नाबाद १० यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे भारताने न्यूझीलंडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते.
न्यूझीलंडकडून हेमिश बॅनेटने ३ तर मिशेल सँटनर व कोलिन डि ग्रँडहोम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. टीम साऊदी गो. हेमिश बेनेट ६५, लोकेश राहुल झे. कोलिन मुन्रो गो. कोलिन डि ग्रँडहोम २७, शिवम दुबे झे. ईश सोधी गो. हेमिश बेनेट ३, विराट कोहली झे. टीम साऊदी गो. हेमिश बेनेट ३८, श्रेयस अय्यर यष्टिचित टीम सेईफर्ट गो. मिचेल सँटनर १७, मनीष पांडे नाबाद १४, रविंद्र जडेजा नाबाद १०.
अवांतर ः ५. एकूण २० षट्‌कांत ५ बाद १७९ धावा.

गडी बाद होण्याचा क्रम ः १-८९ (लोकेश राहुल, ९),२-९४ (रोहित शर्मा, १०.४), ३-९६ (शिवम दुबे, ११), ४-१४२ (श्रेयस अय्यर, १७), ५-१६० (विराट कोहली, १८.५)
गोलंदाजी ः टीम साऊदी ४/०/३९/०, हेमिश बेनेट ४/०/५४/३, स्कॉट कुगेलिजीन २/०/१०/०, मिचेल सँटनर ४, ईश सोधी ४/०/२३/०, कॉलिन डी ग्रँडहोम २.
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. राखीव गो. शार्दुल ठाकुर ३१, कॉलिन मुनरो यष्टिचित लोकेश राहुल गो. रविंद्र जडेजा १४, केन विल्यमसन झे. लोकेश राहुल गो. मोहम्मद शमी ९५, मिचेल सँटनर त्रिफळाचित गो. युजवेंद्र चहल ९, कॉलिन डी ग्रँडहोम झे. शिवम दुबे गो. शार्दुल ठाकुर ५, रॉस टेलर त्रिफळाचित गो. मोहम्मद शमी १७, टिम सेफर्ट नाबाद ०. अवांतर ः ८. एकूण २० षट्‌कांत ६ बाद १७९ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-४७ (मार्टिन गप्टिल ५.४), २-५२ (कॉलिन मुन्रो ६.२), ३-८८ (मिचेल सँटनर १०.४), ४-१३७ (कॉलिन डी ग्रँडहोम १६), ६-१७८ (केन विल्यमसन १९.३), ६-१७९ (रॉस टेलर २०)
गोलंदाजी ः शार्दुल ठाकूर ३/०/२१/२, मोहम्मद शमी ४/०/३२/२, जसप्रीत बुमराह ४/०/४५/०, युजवेंद्र चहल ४/०/३६/१, रविंद्र जडेजा ४/०/२३/१, शिवम दुबे १/०/१४/०.