
केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका देताना चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशमच्या गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे काल पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोपवले. टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असले तरी एनडीए सरकारला आमचा बाहेरून पाठिंबा असेल असे नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.
टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्यापूर्वी पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. यामुळे टीडीपी एनडीएत कायम राहणार असे वाटत होते. मात्र, तोडगा निघू न शकल्याने दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. दरम्यान, या घटनेनंतर आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपच्या दोन मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत.
आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून सावत्र वागणूक मिळत असल्याची टीका करत, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा मंगळवारी रात्री केली होती. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान तंत्रज्ञानमंत्री वाय. एस. चौधरी यांना दोन्ही मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश त्यांनी दिले होते.