टीकेचे ऑस्कर

0
80

सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नावाची घोषणा करताना चुकीचा लखोटा उघडला गेल्याने झालेल्या गोंधळामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा चर्चेत असला, तरी या संपूर्ण सोहळ्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कलाजगतातील दिग्गजांनी शालजोडीतील लगावून व्यक्तीस्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांचा जो जागर केला तो ऐतिहासिक म्हणायला हवा. या सोहळ्यात ठायीठायी ट्रम्प यांच्या अतिरेकी धोरणांविरुद्धचा संताप मुखर होताना दिसून आला. सूत्रनिवेदक जिमी किमेल यांच्या निवेदनात ठायीठायी तर तो दिसलाच, परंतु पुरस्कार विजेत्यांपासून पुरस्कार द्यायला मंचावर आलेल्यांपर्यंत अनेकांनी आपला संताप सुस्पष्टपणे प्रकट करीत जे धैर्य दाखविले, ते अवघ्या जगाला दिशादर्शक ठरावे. ट्रम्प यांच्या राजवटीवरील हे शाब्दिक हल्ले व्यक्तिगत आकसापोटी नव्हते, तर ज्या उदारमतवादी मूल्यांवर अमेरिका नावाची महासत्ता एवढी वर्षे उभी आहे, त्यांनाच सुरूंग लावायला निघालेल्या एका उद्धट आणि अविवेकी सत्ताधीशाला आरसा दाखवण्यासाठी होतेे. काही देशांतील स्थलांतरितांना अमेरिकेत घातलेली प्रवेशबंदी, स्थलांतरांप्रतीची असहिष्णुता, मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा प्रस्ताव अशा सगळ्या राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी असल्याने कलाजगताच्या या झगमगत्या सर्वोच्च सोहळ्यामध्ये त्यांचे पडसाद उमटणार की नाही एवढाच प्रश्न होता, परंतु हे पडसाद उमटले आणि तीव्रपणे उमटले. सूत्रनिवेदक जिमी किमेल यांनी सुरवातीपासून ट्रम्प यांना टोले लगावायला सुरूवात केलीच होती. या सोहळ्याचे प्रक्षेपण होत असलेले २२५ देश आज अमेरिकेचा तिरस्कार करीत असतील हेही त्यांनी सांगून टाकले. गेल्या गोल्डन ग्लोब सोहळ्यामध्ये ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांचा ट्रम्प यांनी छद्मीपणाने ‘ओव्हररेटेड’ असा उल्लेख केला होता. त्यांना या सोहळ्यात श्रोत्यांकरवी मानवंदना देताना त्या अनुद्गारांकडे लक्ष वेधले, फ्रान्सची अभिनेत्री इझाबेलला ‘गृहखात्याने येऊ दिल्या’ बद्दल आनंद दर्शवला आणि दोन तास चाललेल्या या सोहळ्यावर ट्रम्प यांची ट्वीट कशी आली नाही असा सवाल करीत त्यांना थेट मंचावरून दोन जाहीर ट्वीट करून चिथावले. पुरस्कार विजेत्यांनीही ट्रम्प यांच्या प्रतीची नाराजी व्यक्त करण्याची संधी अचूक साधली. इटालियन मेकअप कलाकार अलेस्सांड्री बार्तोलाझींनी आपला पुरस्कार सर्व निर्वासितांना अर्पण केला, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या ‘मूनलाईट’चे दिग्दर्शक बेरी जेनकिन्स यांनी वंचितांनी अमेरिकी नागरी स्वातंत्र्य संघटनेची मदत घेण्याचे आवाहन केले. वॉरन बॅटींपासून रीच मूरपर्यंत अनेकांनी ट्रम्प राजवटीच्या असहिष्णुतेला फटकार लगावली. ज्या मेक्सिकोच्या सीमेवर ट्रम्प भिंत बांधायला निघाले आहेत, त्या मेक्सिकोचे कलाकार गाएल गार्सिया बर्नाल यांनी ‘‘आम्हाला वेगळे पाडणार्‍या सर्व भिंतींना विरोध’’ असल्याचे ठणकावले. कळस गाठला तो इराणचे दिग्दर्शक असगर फरहादी यांनी पाठविलेल्या लिखित संदेशाने. अमेरिकेने प्रवेशबंदी घातलेल्या माझ्या देशबांधवांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपण अनुपस्थित राहात असल्याचा जळजळीत संदेश त्यांनी पाठवला. हे सगळे काय दर्शवते? कलाजगत सामाजिक अथवा राजकीय घटना – घडामोडींपासून अलिप्त राहू शकत नाही, स्वतःच्याच कोशात खूष राहू शकत नाही हेच या सोहळ्यातील या प्रखर राजकीय टीकेने दर्शविले आहे. आपल्याकडे अशा प्रकारच्या सोहळ्यांमध्ये चमचमाट, झगमगाट असतो, परंतु सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य क्वचितच केले जाते. ‘मला काय त्याचे?’ म्हणत अलिप्त राहण्यात शहाणपण मानणार्‍या तमाम कलावंतांना यंदाच्या ऑस्कर सोहळ्याने काही शिकवलेले नाही काय?