कॉंग्रेस पक्षाने पेट्रोल, डिझेल दरवाढीचा काल निषेध केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून इंधन दरवाढ सुरू असल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड यांनी टांग्यातून प्रवास करून इंधन दरवाढीचा निषेध केला.
कॉंग्रेस मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. पेट्रोलचे दर कमी करा, अशी मागणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. कॉंग्रेस पक्षाने इंधन दरवाढ कमी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना एक निवेदन सादर केले. गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो, सेवा दलाचे शंकर किर्लपालकर, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके व इतरांनी रॅलीत सहभाग घेतला.
पेट्रोलच्या दरवाढीचा सामान्य नागरिकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने पेट्रोलचा दर ६० रुपयांच्या आसपास ठेवण्याची घोषणा केली होती. परंतु, आज राज्यात पेट्रोलच्या दराने सत्तरी ओलांडली आहे. पेट्रोलचा दर नियंत्रणाखाली ठेवण्याची घोषणा हवेत विरली आहे, असे विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ सल्लागार समितीने वाढत्या पेट्रोलच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना करावी. पेट्रोलची दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी पेट्रोलचा जीएसटीमध्ये समावेश करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी केली.