युक्रेन-रशियातील युद्ध अधिक भडकण्याची शक्यता
रशियाचा युक्रेनवर द्रोन, क्षेपणास्त्र हल्ला
रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोन्ही देश युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम इतर देशांवर होताना दिसत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी झेलेन्स्की यांना मॉस्कोत भेटण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव झेलेन्स्की यांनी फेटाळून लावला आहे. या उलट झेलेन्स्की यांनी मॉस्कोऐवजी कीवमध्ये बैठकीची मागणी केली आहे. यामुळे आता दोन्ही देशांतील तणाव वाढून युद्ध अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, काल रशियाने युक्रेनच्या सरकारी इमारतींवर हल्ला चढवताना द्रोन हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
झेलेन्स्की आणि पुतिन यांच्यात द्विपक्षीय किंवा त्रिपक्षीय बैठक व्हावी यासाठी अलास्का शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शिखर परिषदेनंतर ट्रम्प म्हणाले की, झेलेन्स्की आणि युरोपीय देशांचे नेते वॉशिंग्टनला येतील. यानंतर पुतिन आणि झेलेन्स्की भेटू शकतात. ट्रम्प समोरासमोर चर्चेसाठी दबाव आणत आहेत. मात्र यावेळी पुतिन यांनी झेलेन्स्की यांना मॉस्कोमध्ये चर्चेसाठी निमंत्रित केले होते. या संदर्भात बोलताना
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी, मी दहशतवाद्यांच्या राजधानीत जाऊ शकत नाही, कारण युक्रेनला दररोज क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पुतिन बैठकीसाठी कीवला येऊ शकतात. मॉस्कोमध्ये चर्चेचा प्रस्ताव देणे हे रशियाला शांतता चर्चेत रस नसल्याचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान झेलेन्स्की यांनी शनिवारी एक पोस्ट करत, सप्टेंबरच्या पहिल्या पाच दिवसात रशियाने युक्रेनवर 1300 हून अधिक ड्रोन हल्ले केले. 900 बॉम्ब आणि विविध प्रकारच्या 50 क्षेपणास्त्रांचा मारा केला. हे हल्ले युक्रेनच्या 14 भागात झाले होते असा दावा केला आहे.
झेलेन्स्की यांनी, मी प्रत्येक स्वरूपात बैठकीसाठी तयार आहे. स्वित्झर्लंड, तुर्की, व्हॅटिक आणि आखाती देशांसारखे अनेक देश शांतता चर्चा करण्यास तयार आहे. पण कोणी युद्धादरम्यान असा प्रस्ताव मांडला तर तो स्वीकारता येत नाही. तर तो वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे आता हे युद्ध जर चर्चेने सुटलं नाही तर आणखी पेटण्याची शक्यता आहे.
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला
युक्रेनने रशियाच्या परमाणू ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर आता रशियाने थेट सरकारी इमारतींना टार्गेट करत मोठा हल्ला केला. रशियाच्या जोरदार हवाई हल्ल्याने युक्रेनची राजधानी कीव हादरली. रात्रभर द्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला सुरू होता. या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला तर 18 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या सरकारी मुख्यालयाला आग लागली. काहीवेळाच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश मिळाले.
रशियाने एकाच रात्रीत 805 द्रोन आणि 13 क्षेपणास्त्रे कीवमध्ये टाकली. हा आतापर्यंतचा मोठा हल्ला असल्याचेही सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर काही भागात आगीच्या घटना देखील घडल्या. मात्र, अजून रशियाची या हल्ल्याबाबतची भूमिका स्पष्ट झालेली नाही.