‘झुआरी ऍग्रो’ जमीन घोटाळ्याची चौकशी होणार

0
16

>> मुख्यमंत्री; ऍडव्होकेट जनरलच्या सल्ल्यानंतर कंपनीवर कारवाई

झुआरीनगर येथील झुआरी ऍग्रो केमिकल्स कंपनीने विक्री केलेल्या ५० लाख चौरस मीटर एवढ्या जमीन घोटाळ्याची चौकशी केली जाणार असल्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला कॉंग्रेसचे आमदार मायकल लोबो यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी हे आश्‍वासन दिले.

काल विधानसभेत हा प्रश्‍न उपस्थित करताना लोबो म्हणाले की, हा एक प्रचंड मोठा असा जमीन घोटाळा आहे. १९६८ साली तत्कालीन सरकारने सांकवाळ कोमुनिदादीची ही ५०० हेक्टर म्हणजेच ५० लाख चौ.मी. जमीन तेथे उद्योग स्थापन करण्यासाठी झुआरी ऍग्रो केमिकल्स या कंपनीला लीजवर दिली होती. सदर कंपनीने झुआरी ऍग्रो केमिकल्स हा आपला खत उत्पादनाचा कारखाना विकताना ती जमीन देखील विकून टाकली असल्याचे लोबो यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

नारायण नाईक नामक व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर सदर कार्यालयाने गोव्याच्या मुख्य सचिवांकडे याविषयीच्या अहवालाची मागणी केली होती; मात्र हा अवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लोबो म्हणाले. झुआरी ऍग्रो कंपनीला उद्योग सुरू करण्यासाठी दिलेली जमीन सदर कंपनीने ‘परदीप फॉस्फेट्‌स’ला कशी काय विकली असा प्रश्‍न करून या जमिनीची विक्री करणार्‍या झुआरी ऍग्रो कंपनीवर काय कारवाई करणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले की, या प्रकरणी सरकारने कायदा खाते व राज्याच्या ऍडव्होकेट जनरलकडून सल्ला मागितला असून, त्यांच्या याविषयीचा अहवाल आल्यानंतर सरकार झुआरी ऍग्रो कंपनीवर आवश्यक ती कारवाई करेल.

त्यावर लोबोंनी तेथे भूखंडांची विक्री सुरू आहे त्यावर लक्ष ठेवा आणि यापुढे आणखी भूखंडांची विक्री होऊ देऊ नका, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना कारवाई आश्‍वासन मोन्सेरात यांनी दिले. तसेच महसूल सचिवांना आम्ही कुणालाही जमिनीची सनद देऊ नका, अशी सूचना केल्याचेही ते म्हणाले.

यावेळी विजय सरदेसाई म्हणाले की, तेथील जमिनीचा दर हा २० हजार रुपये प्रती चौ. मी. एवढा आहे. मात्र काही विक्रीपत्रांवर हा दर अवघा ३२०७ रुपये प्रती चौ. मी. एवढा दाखवण्यात आला आहे. जमिनीचा प्रती चौ. मी. एवढा दाखवण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्याचीही चौकशी करा, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला.
यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिले. त्यावर सरदेसाईंनी चौकशीसाठी सभागृह समितीची स्थापना करा, अशी मागणी केली. यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात बरीच शाब्दिक चकमक झाली.

प्रकरण एसआयटीकडे
सोपवा : सरदेसाई

विजय सरदेसाई यांनी जमीन घोटाळ्याची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हे प्रकरण सोपवण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जमिनींची आम्हालाही चिंता आहे. आम्ही या प्रकरणी योग्य ती चौकशी करू, असे सांगितले.