झारखंड विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने मोर्चेबांधणी सुरू करताना विधानसभेच्या एकूण 81 जागांसाठी जागा वाटप जाहीर केले. यात सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व काँग्रेस मिळून एकूण 70 जागा लढवणार आहेत. उर्वरित 11 जागा राष्ट्रीय जनता दल व डाव्या पक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. मात्र या जागावाटपामुळे इंडिया आघाडीतील दुफळी समोर आली असून राष्ट्रीय जनता दलाने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत,’ असा इशारा राजदने दिला आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री व झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांनी, झारखंड विधानसभेची निवडणूक आम्ही (इंडिया आघाडी) एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. यात 70 ठिकाणी झामुमो व काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. उर्वति जागा राजद व डाव्या पक्षांना दिल्या जातील असे सांगितले.
जागावाटप एकतर्फी ः राजद
इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने या जागावाटपाबाबत नाराजी व्यक्त केली. जागावाटपाचा हा निर्णय एकतर्फी असून याबाबत आमच्याशी चर्चा करण्यात आली नाही,’ अशी प्रतिक्रिया ‘राजद’चे प्रवक्ते मनोज कुमार यांनी दिली. ा.
दरम्यान, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने शुक्रवारीच जागावाटप घोषित केले होते.