झाडू

0
24

(॥ क्षणचित्रं… कणचित्रं…॥

  • – प्रा. रमेश सप्रे

अस्वच्छता, दारिद्य्र यांसारख्या नकारात्मक गोष्टींच्या अंधारावर मात करण्यासाठी लक्ष्मी हीच योग्य देवता आहे. तिच्या हातात कोणतंही आयुध नाही. पण द्यायचंच झालं तर एकच देता येईल ते म्हणजे सर्व प्रकारची स्वच्छता करणारा झाडू! त्याच्यातच लक्ष्मी असते…

‘ए, तो झाडू आडवा ठेवू नकोस. उभा ठेव भिंतीला टेकवून’ या आजीच्या शब्दांनी चकित होऊन सोनालीनं विचारलंच, ‘का गं आजी?’ झाडू उभा किंवा आडवा यानं काय फरक पडतो?’ तिला हेही आठवलं की दोन दिवसांपूर्वी केर काढण्यापूर्वी आईनं पहिल्यांदा केरसुणीला हळदीकुंकू वाहिलं. नमस्कार केला. मग घर झाडायला सुरुवात केली होती. त्यावेळीही तिचं कुतूहल वाढलं होतं. दोन्ही वेळी एकच उत्तर मिळालं होतं, ‘त्यांच्यात (झाडू, केरसुणी यांच्यात) लक्ष्मीदेवी असते.’ ‘हे कसं काय?’ हा प्रश्‍न विचारल्यावर स्पष्टीकरण मिळालं… ‘अगं, झाडू, केरसुणी स्वच्छता राखायला मदत करतात. स्वच्छतेमुळे रोग टळून आरोग्य मिळतं. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं.’ आपण असा विचारच केला नव्हता असं स्वतःला सांगत सोनूनं स्वतःचं समाधान करून घेतलं.
झाडू, केरसुणी, खराटा ही विविध रूपं आणि नामं एकाच गोष्टीची. त्यांचं आजचं नवं रूप व्हॅक्युम् क्लीनर. आणि हे स्वच्छतेचं काम जर ह्युमनॉइड रोबो म्हणजे मानवासारखे दिसणारे नि विविध कामं करणारे यंत्रमानव करत असतील तर सारी वास्तू क्षणात चकाचक!
आपल्या कीर्तनकार काकांचं ‘दत्तगुरूंनी केलेले विविध गुरू’ या विषयावरचं रसाळ कीर्तन ऐकून भावेशनं विचारलं, ‘काका, दत्तगुरूंनी आपल्या गुरूत झाडूचा समावेश केला असता का?’ काका कौतुकानं उद्गारले, ‘का नाही? निश्‍चित केला असता. त्यांचे चोवीस गुरू हे उदाहरणार्थ स्वरुपाचे आहेत. शेवटी स्वतःला (म्हणजे बुद्धीला) पंचविसाला गुरू केलाच की नाही? स्वतःच स्वतःचा गुरू… हे खरं शिक्षण आहे!
झाडू संतांचं स्वरूप आहे. स्वतः त्रास सोसून इतरांना सुख-समाधान देतात ते खरे संतसत्पुरुष. झाडू किंवा दारातलं पायपुसणं हे स्वतः इतरांच्या पायाची धूळ, घाण शोषून घेऊन आसपास स्वच्छता निर्माण करतात.
झाडूमुळे जमलेला केर ही टाकाऊ वस्तू नव्हे. आज ओला कचरा- सुका कचरा असं विभाजन करून त्याच्यापासून अतिशय उपयुक्त असं खत निर्माण केलं जातं. हे मूल्यवर्धनाचं (व्हॅल्यू ऍडिशन) सुंदर उदाहरण आहे. यात झाडूचं योगदान मोठं आहे.

निसर्गातल्या वस्तूंपासून तयार केलेल्या झाडू-केरसुणी-खराटा यांसारख्या गोष्टी निसर्गाला, परिसराला स्वच्छ करतात. ही एका अर्थी आपल्या आईवडिलांबद्दल (निसर्गाबद्दल) त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे. त्यांनी केलेली समाजसेवाच आहे.

केरसुणी घायपात नावाच्या वनस्पतीपासून, तर इतर झाडू विशिष्ट गवतापासून बनवतात. आपल्या सर्वांच्या जीवनात असलेला खराटा हा माडाच्या झावळ्यांच्या मधल्या काड्यांपासून (चुडतांच्या हिरांपासून) तयार करतात. आपल्या या मूळ वनस्पतींच्या ऋणातून झाडू सर्वत्र स्वच्छता निर्माण करून मुक्त होतात.

सेनापती बापट हे अगदी पहाटेपासून झाडू घेऊन रहिवासी वस्तीतले रस्ते स्वच्छ करत असत. एकदा एका ज्येष्ठ समाजसेवकानं त्यांना विचारलं, ‘सेनापती, आपलं हे काम कौतुकास्पद आहे. पण यात लोकांचा सहभाग किती आहे?’ यावर सेनापती म्हणाले, ‘जरा थांबा. लोकांचा सहभाग तुम्हाला दिसेलच.’ आणि काय आश्‍चर्य! घरांची एकेक खिडकी उघडली जाऊन तिच्यातून घरातील कचरा खाली रस्त्यावर टाकायला सुरुवात झाली. सेनापती म्हणाले, ‘हा पहा लोकांचा उत्स्फूर्त सहभाग!’ लोकांची ही मनोवृत्ती अजूनही तशीच आहे. आपण स्वतःच्या हातानं रस्ते घाण करायचे आणि तोडानं सिंगापूरमधील स्वच्छतेचं कौतुक करत राहायचं, हे बरोबर आहे का?
अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या संत गाडगे महाराजांचा भर स्वच्छता निर्माण करण्यावर असे. त्यावेळी पंढरपूरची यात्रा असो की गावातल्या देवळाची मोठी जत्रा असो. मोठ्या संख्येनं लोक एकत्र जमत आणि स्वच्छतेची सवय नसल्यानं आणि तशी व्यवस्थाही नसल्यामुळे कॉलरासारख्या (पटकी) रोगाची साथ येऊन हजारो लोक मृत्युमुखी पडत असत. याला अनेकजण अंधश्रद्धेनं मरीआई देवीचा कोप समजून तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे-बकरे यांचा बळी देत, पण रोग काही आटोक्यात येत नसे. अशावेळी पू. गाडगे महाराज अचानक येऊन लोकांना आपापल्या घरातून झाडू आणायला सांगत. एक झाडू घेऊन स्वतः झाडू लागत. ते वाकून आडवा झाडू मारत त्यावेळी जमिनीवरील सर्व केरकचरा दूर होई. त्यांच्या झाडूचं लालित्य म्हणजे सहजता नि सौंदर्य पाहण्यासारखं असे. असं झाडून झाल्यावर सर्वांना उद्देशून गाडगे महाराज म्हणत- ‘आता मरी देवीचा कोप होणार नाही. स्वच्छता नि आरोग्य-लक्ष्मीचा आशीर्वाद मात्र निश्‍चित मिळेल…’ आणि व्हायचंही तसंच. गावंच्या गावं स्वच्छतेचं महत्त्व पटून त्याप्रमाणे वागल्यामुळे रोगमुक्त होत. असो.

एखादा उमेदवार निवडणुकीसाठी झाडू ही खूण निवडतो. प्रचाराच्या वेळी समाजातील भ्रष्टाचार, रोगराई, प्रदूषण, अंधश्रद्धा इ. झाडून दूर करण्यासाठी नि आरोग्याचं नवयुग सुरू करण्यासाठी मी ‘झाडू’ घेऊन उभा आहे. प्रत्यक्षात निवडून आल्यावर मात्र इकडची-तिकडची घाण दूर करण्याऐवजी स्वतःच मलीन, भ्रष्ट होऊन जातो. हा झाडूचा सर्वात घोर अपमान नाही का?
दिवाळीत सर्वत्र झगझगीत प्रकाश असताना लक्ष्मीपूजन मात्र केलं जातं अमावस्येच्या रात्री. तिचं वाहनही घुबड आहे जे फक्त अंधारात पाहू शकतं. वरदलक्ष्मी किंवा मार्गशीर्षातील गुरुवारसारखं लक्ष्मीचं (म्हणजे समृद्धी प्राप्तीसाठी केलेलं) व्रत हे संध्याकाळी अंधार पडण्याच्या सुमारास केलं जातं. याचा अर्थ स्पष्ट आहे- अस्वच्छता, दारिद्य्र यांसारख्या नकारात्मक गोष्टींच्या अंधारावर मात करण्यासाठी लक्ष्मी हीच योग्य देवता आहे. तिच्या हातात कोणतंही आयुध (शस्त्र) नाही. पण द्यायचंच झालं तर एकच देता येईल ते म्हणजे सर्व प्रकारची स्वच्छता करणारा झाडू! पटतंय ना?