झटपट प्रतिज्ञापत्र !

0
286

५० रुपयांत प्रतिज्ञापत्र : डिचोली मामलेदारांचा अभिनव उपक्रम
संपूर्ण देशात पहिल्यांदाच सामान्य जनतेसाठी ऑन लाईन दाखले पुरवण्याची अभिमानास्पद कामगिरी बजावणार्‍या डिचोलीचे मामलेदार गुरुदास देसाई यांनी सर्वसामान्यांना प्रतिज्ञापत्रासाठी (ऍफेडेव्हीट) होणारा त्रास, पैसा, वेळ यापासून मुक्ती देतानाच मामलेदार कार्यालयातच छापील तयार प्रतिज्ञापत्र फक्त ५० रुपयांच्या खर्चात उपलब्ध करून देण्याची योजना यशस्वी केल्याने हजारो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.प्रतिज्ञापत्राची ही योजना उत्तर गोव्यात सर्व तालुक्यात लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने जिल्हाधिकारी नीला मोहन यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी नीला मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली मामलेदार गुरुदास देसाई यांनी हल्ली अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. या नुसार नऊ प्रकारचे प्रतिज्ञापत्राचे नमुने छापील स्वरूपात तयार केले असून संबंधितांना आवश्यक तेवढी माहिती भरून सादर करायची आहे. दरम्यान, माहिती भरून देण्यासाठी मदततीची व्यवस्थाही मामलेदार कार्यालयात करण्यात आली आहे. फक्त ५० रुपयांचा स्टॅम्प लावून व सही करून प्रतिज्ञापत्रे सादर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे डिचोली तालुक्यातील सुमारे २५ हजार लोकांना त्याचा लाभ मिळणार असून वेळ पैसा, हेलपाटे व त्याचबरोबर होणारा मनस्तापही कमी होणार आहे.
प्रतिज्ञापत्रे तयार करण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो. त्याशिवाय त्याच्या प्रति काढण्यासाठी खर्च होतो व वेळेचाही अपव्यय होतो. त्यापासून पूर्णपणे मुक्ती देण्यात मामलेदार देसाई यांना यश आले आहे. जनतेला तत्पर सेवा मिळावी या हेतूने या कल्पनेला पूर्ण स्वरुप देण्यासाठी जिल्हाधिकारी नीला मोहन यांचेही मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे गुरुदास देसाई यांनी सांगितले.
दरम्यान,ऑनलाईन दाखले देण्याची योजना गुरुदास देसाई यांचीच असून वर्षभरात सहा हजार दाखले ऑन लाईन पुरवण्यात आले आहेत.