ज्येष्ठ विधिज्ञ फली एस. नरिमन यांचे निधन

0
1

प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस. नरिमन यांचे बुधवारी सकाळी नवी दिल्लीत निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होते.
नोव्हेंबर 1950 पासून फली नरिमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. 1961 मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी 70 वर्षांहून अधिक काळ कायद्याचा सराव केला. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि 1972 पासून नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत होते. मे 1972 मध्ये ते मुंबईहून दिल्लीला गेले, तेव्हा त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले.

10 जानेवारी 1929 रोजी रंगून येथे जन्मलेले फली नरिमन यांचे शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी मिळवली. फली यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती; पण त्यांनी मात्र सरळ मुंबईतील सरकारी विधि महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुवर्णपदकासह त्यांनी विधि शाखेची पदवी मिळवली. मग मुंबई उच्च न्यायालयात 1950 पासून त्यांनी वकिली सुरू केली. वीस वर्षे वकिली केल्यानंतर 1971 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ बनले. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात घेऊन 1972 मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती केली. 1975 पर्यंत ते या पदावर होते.

सार्वजनिक जीवनातील नरिमन यांच्या कामाची दखल घेऊन सरकारने पद्मभूषण (1991), तसेच पद्मविभूषण (2007) देऊन त्यांचा गौरव केला. 1999 मध्ये राष्ट्रपतींनी राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

‘आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक…’
इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करताच त्याचा निषेध म्हणून फली नरिमन यांनी लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला व खासगी वकिली सुरू केली. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर नरिमन हे युनियन कार्बाइड कंपनीचे वकील होते; मात्र पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर ‘आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक’ अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिलीच; पण या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणताना पीडितांना 47 कोटी डॉलरची भरपाई मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.