>> वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे काल मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुळचे गोव्याचे असणार्या मोहनदास सुखटणकर यांनी ‘द गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेतून अनेक नाटके गाजवली. कलाकार म्हणून रंगभूमीवर प्रवेश केलेल्या मेहनदास यांनी पुढे ‘द गोवा हिंदू असोसिएशन’चा खंदा कार्यकर्ता म्हणून काम पाहिले. केवळ नाटकच नव्हे, तर मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी दमदार भूमिका केल्या. अगदी शालेय वयापासून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.
मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्यात नामांकित डॉक्टर होते. मोहनदास सुखटणकर यांचे बालपण गोव्यात गेले. त्यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गोव्यातील माशेल आणि म्हापसा येथे झाले.
सुखटणकर यांनी अनेक मराठी नाटके, चित्रपट मालिका आणि हिंदी चित्रपटांतही काम केले.