ज्ञानोपासक

0
156
  •  सोमनाथ कोमरपंत

पद्मश्री प्राचार्य सुरेश आमोणकर यांनी ८ डिसेंबर २०१९ रोजी लौकिक जगाचा निरोप घेतला. ही दुःखद वार्ता ऐकल्याबरोबर निरंतर ज्ञानसाधनेत मग्न असलेल्या तपस्वी प्रज्ञावंताच्या जीवनाचे पर्व संपल्याची जाणीव तर झालीच; शिवाय गोमंतभूमीचा वैचारिक वारसा जपणार्‍या थोर विचारवंताला आपण आता कायमचे मुकलो याची हळहळ वाटली.

पद्मश्री प्राचार्य सुरेश आमोणकर यांनी ८ डिसेंबर २०१९ रोजी लौकिक जगाचा निरोप घेतला. ही दुःखद वार्ता ऐकल्याबरोबर निरंतर ज्ञानसाधनेत मग्न असलेल्या तपस्वी प्रज्ञावंताच्या जीवनाचे पर्व संपल्याची जाणीव तर झालीच; शिवाय गोमंतभूमीचा वैचारिक वारसा जपणार्‍या थोर विचारवंताला आपण आता कायमचे मुकलो याची हळहळ वाटली. आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जाणारच असते. हे तर अटळच आहे. पण जाण्यापूर्वी ती आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा इतिहासाच्या पटलावर ठेवून जात असते. ज्या प्रकारचे ध्यासपंथी जीवन ‘प्राचार्य’ आमोणकर सर जगले त्याला तोड नाही. त्यांच्या ज्ञानसाधनेमध्ये त्यांचा झपाटलेपणा प्रकट झाला होताच. पण अलीकडे ज्या आजाराने त्यांना पछाडलेले होते, त्याची तसुभरही तमा न बाळगता अखंड कर्मयोगी आणि ज्ञानयोगी म्हणून त्यांनी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जीवन व्यतीत केले. गोमंतभूमीच्या संचिताचा वारसा त्यांनी आदर्शवत मानला होता.

भारतीय जीवनमूल्यांविषयीची त्यांची बैठक पक्की होती. विश्‍वसाहित्याचा धांडोळा त्यांनी विचक्षण वृत्तीने घेतला होता. ते खर्‍या अर्थाने बहुभाषाकोविद होते. मराठी, कोंकणी, हिन्दी, इंग्रजी, पोर्तुगीज, पाली, संस्कृत इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. या भाषांमधील अक्षरसाहित्याचा आस्वाद घेण्याची क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. भाषाभाषांच्या समन्वयामुळे आणि सामंजस्यामुळे मानवी मनात सेतू निर्माण होतो. हृदये विशाल होतात. प्रगल्भ होतात. या जीवनसरणीवर त्यांची असीम श्रद्धा होती. ही ते बोलून दाखवीत असत. त्याप्रमाणे त्यांनी आचरणही केले. त्यांनी अवलंबिलेली अनुवाद प्रक्रिया हे याच जीवनसरणीचे अविभाज्य अंग होते. ते सेवानिवृत्त व्हावयाच्या तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या फोर्टमधील पदपथावर त्यांना ‘धम्मपद’ ही पाली-इंग्रजी पुस्तिका मिळाली. मूळ पाली भाषेतील हे पुस्तक कोकणीत अनुवादित करण्याची ऊर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. तो एक स्फुल्लिंग होता. कालांतराने त्या भावनेचा विकास होत गेला. अध्ययनशीलतेची, व्यासंगाची जोड मिळत गेली. ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समश्‍लोकी आणि गद्य अनुवाद त्यांनी ‘श्री भगवंतान गायिल्लें गीत’ या नावाने केला. तिरुवळ्ळुकर यांच्या ‘तिरुक्कुरळ’ किंवा ‘कुरळ’ या अभिजात स्वरूपाच्या ग्रंथाचा अनुवाद त्यांनी केला. नंतर श्रीमद्भगवद्गीतेवरील महान आणि सरसरमणीय भाष्य असलेल्या ज्ञानेश्‍वरीच्या अभ्यासाकडे ते वळले’. ते आव्हानात्मक कार्य होते. फार मोठा प्रकल्प होता तो. पण अभंग जिद्दीने, प्रज्ञा-प्रतिभेच्या संयोगाने आणि अखंडित परिश्रमांमुळे तो संकल्प त्यांनी पूर्णत्वाला नेला. भारतीय भाषांतील ज्ञानेश्‍वरीच्या सरस अनुवादामध्ये आमोणकरांच्या ‘ज्ञानेश्‍वरी’च्या कोंकणी अनुवादाचा गौरवपूर्ण उल्लेख होऊ लागला. हा अनुवाद करीत असताना ज्ञानेश्‍वरीविषयक अनेक भाष्यग्रंथांचे, समीक्षाग्रंथांचे आणि विविध कोशांचे प्राचार्य आमोणकरांनी आलोदन केले. ज्ञानेश्‍वरीच्या ओव्यांचा एकदा अनुवाद करून ते थांबत नसत. आशय, अभिव्यक्ती, तात्त्विक मथितार्थ आणि समुचित शब्दकळा यांची समाधानकारक गुंफण झाली नाही तर त्यांची परिष्करणे पुनः पुन्हा करण्यात ते मागे-पुढे करीत नसत. परिपूर्णता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव. प्रयत्नांवर त्यांची भिस्त. पण त्याचबरोबर कोणत्या तरी अदृश्य शक्तीने आपल्याकडून हे काम करवून घेतले आहे अशा श्रद्धेची जोड त्यांनी दिली होती. त्यामुळे त्यांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्त्वाला नवी झळाळी प्राप्त झाली.
ज्ञानेश्‍वरीचा अनुवाद पूर्णत्वाला गेला. आयुष्याची आता इतिश्री असे त्यांनी कधीच मानले नाही. याज्ञवल्क्य ऋषींचे एक वचन आहे ः
आत्मा वा अरे मन्तव्यः श्रोतव्यः निदिध्यासितव्यः |
– ‘‘हे मानवा, आत्म्याच्या स्वरूपाचा विचार कर, आत्म्याच्या हाका ऐक. आत्मज्ञान हेच ध्येय मान. त्याचाच निदिध्यास बाळग!’’
प्राचार्य आमोणकरांनी ज्ञानसाधना ही अध्यात्मसाधना मानली. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. कर्मकांडाची त्यांना गरज भासली नाही. पुन्हा भारतीय परंपरेतील विचारधारांमधील अंतःसूत्र आणण्याचे निमित्ताने त्यांनी गुरु नानकदेवांच्या ‘जपुजीसाहिब’ या ग्रंथाचा भावानुवाद केला. ‘बायबल’मधील शुभवर्तमानांपैकी सेंट जॉनच्या शुभवर्तमानाचा- गोस्पेलचा त्यांनी कोंकणीतून अनुवाद केला. त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वातील – फादर स्टीफन्सच्या ‘क्रिस्तपुराणा’चा अनुवाद हे बृहद् स्वरूपाचे कार्य होय. ते अतुलनीय स्वरुपाचे आहेच. शिवाय सहधर्मचारिणी सौ. सुधाताई आमोणकर यांच्या अवेळी झालेल्या निधनाने खचू न देता ते कार्यरत राहिले. स्वतःच्या शारीरिक यातनांचा हसत हसत स्वीकार करीत त्यांनी प्रकट केलेली ‘मृत्युंजयी धडक’ ज्ञानमार्ग पत्करणार्‍यांना प्रेरणा देणारी ठरावी. मात्र त्यांचे अनुकरण कुणालाही करता येणार नाही.

प्राचार्य सुरेश आमोणकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना मती कुंठित होते. त्यांना हा वारसा कोठून मिळाला याविषयीची भावस्मरणे स्मरणोज्जीवित होतात. त्यांचे ज्येष्ठ मामा प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत कवी बा. भ. बोरकर यांची मायाममता त्यांच्या लाडक्या भाच्याला लाभली. त्यांच्या आयुष्याच्या उदयकाली त्यांच्याविषयीची भिस्त बोरकरांच्या मनात होती. आमोणकर अध्यापनकार्यासाठी मोंबासाला गेले तेव्हा बोरकरांनी त्यांच्या भावजीवनाविषयीची ‘प्रियदर्शिनी’ ही कथा गुंफली. पानशेतच्या पुरात ‘प्रियदर्शिनी’ हा कथासंग्रह वाहून गेला. त्यात ही कथा समाविष्ट झालेली होती. ‘सुर्‍या आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवील’ ही त्यांची उक्ती सार्थ ठरली. आमोणकरांचे वडील गुंडू सीताराम आमोणकर हे अध्यापनकुशल शिक्षक होते. ते बुद्धिप्रामाण्यवादी आणि समाजसुधारक होते. इंग्रजी, संस्कृत आणि मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहास व भूगोल या विषयांत त्यांचा हातखंडा होता. गुंडू सीताराम आमोणकर आणि बा. भ. बोरकर यांच्यामधील सौहार्दभाव सर्वश्रुत आहे. बोरकरांच्या भगिनी वासंतीबाई यांच्याशी गुंडू सीताराम आमोणकरांचा झालेला विवाह ही गोमंतकातील सुधारणावादाचा ओनामा होता. रूढिग्रस्त समाजाचा रोषही त्यांना त्यासाठी पत्करावा लागला होता. अनुभवांच्या तप्त मुशीतून सुरेश आमोणकरांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. त्यांच्यावर झालेले विद्यासंस्कार उच्च प्रतीचे होते. इंटर आर्टस्‌पर्यंत विल्सन महाविद्यालयासारख्या नामवंत महाविद्यालयात प्रा. ह. दा. वेलणकर आणि प्रा. अ. बा. गजेन्द्रगडकर यांच्यासारख्या विद्वान प्राध्यापकांकडून त्यांनी संस्कृतचे मार्गदर्शन घेतले. त्याच महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. पुण्याच्या ‘टिळक कॉलेज एज्युकेशन’मधून त्यांनी बी.टी.ची पदवी प्राप्त केली. १९७८ साली इंग्रजी आणि सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.

त्यांचे वडील गुंडू सीताराम आमोणकर यांनी म्हापसा येथे स्थापन केलेल्या ‘न्यू गोवा हायस्कूल’मध्ये त्यांनी स्वतःला अध्यापनक्षेत्रासाठी वाहून घेतले. त्यांच्या अध्यापनकौशल्यामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांचा नावलौकिक सर्वत्र पसरला. जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांच्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य संपादन केले आहे. अर्थात ही यादी फार मोठी आहे. १९९६ मध्ये मुख्याध्यापकपदावरून ते निवृत्त झाले.
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ८ वर्षे धुरा उत्तम प्रकारे सांभाळली आणि येथील शैक्षणिक प्रक्रियेस चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. ज्या प्रतिकूलतेतून त्यांना ही वाट काढावी लागली तो संदर्भही येथे लक्षात घ्यायला हवा. अध्यापनकार्यातील तपश्‍चर्या आणि अनुभव त्यांना उपकारक ठरला. शिवाय स्वतंत्र प्रज्ञेने निर्णय घेण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. त्यांच्या कार्याचा पट पहायला गेलो तर तो अतिशय व्यापक आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामाजिक संवेदनशीलता वसत असल्यामुळे म्हापसा शहराच्या सार्वजनिक हिताकडे त्यांनी लक्ष पुरविले. म्हापसा नगरपालिकेचे ते अकरा वर्षे सदस्य होते. एक वर्ष त्यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. राज्य साक्षरता मोहीम आणि प्रौढ शिक्षण मंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पेलली.

सार्वजनिक क्षेत्रातील एक चैतन्यशील व्यक्तिमत्त्व म्हणून गोवामुक्तीपासून आजतागायत ते वावरत आले. अनेक क्षेत्रात त्यांचा संचार असला तरी शिक्षणक्षेत्र आणि साहित्य हा त्यांचा मर्मबंध होता. अध्ययनाच्या निमित्ताने ते पूर्वपरंपरेशी अधिक निगडित असले तरी अवतीभोवतीची मानसिकता, वैचारिक प्रवाह आणि अंतःप्रवाह व जीवनशैली हेदेखील त्यांच्या आस्थेचे विषय होते. त्यासंबंधी त्यांनी मर्मदृष्टीने लिहिलेली टिपणे मी वाचलेली आहेत.

सरतेशेवटी प्राचार्य सुरेश आमोणकर मला कसे भावले हे सांगणे आवश्यक वाटते. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे त्यांच्याविषयी ऐकून होतो. प्रसंगोपात्त परिचयही झाला. शालान्त मंडळाच्या काही कामाच्या निमित्ताने तेथे जाणेही होई. पण ते ज्या महत्त्वाच्या पदावर होते तेथे जवळीक वाढविणे प्रशस्त नव्हते. पण तीस वर्षांपूर्वी ‘गोमंतक मराठी अकादमी’ने आयोजित केलेल्या बा. भ. बोरकरांवरील चर्चासत्रामुळे आम्ही निकट आलो. बोरकरांचे निकटचे आप्त म्हणून नव्हे; तर बोरकरांच्या वाङ्‌मयाचे रसिक आणि चिकित्सक अभ्यासक म्हणून मला ते अधिक भावले. सार्वजनिक ठिकाणी आणि त्यांच्या घरी जाण्या-येण्याने हे अनुबंध दृढ होत गेले. त्यांच्या अभ्यासातील आस्थेचे विषय मलाही जवळचे वाटायला लागले. ते वयाने ज्येष्ठ होते. व्यासंगामुळे त्यांनी एक श्रेष्ठ स्थान प्राप्त केले होते. पण ते जाणवू न देण्याची संवादी शैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. मायेचा ओलावा होता. वडिलधार्‍या माणसाच्या वृत्तीतील ऊबदारपणा होता. या जिव्हाळायुक्त वातावरणनिर्मितीत सौ. सुधाताईंची साथ होती. अशा कितीतरी आनंदमय घटिका मी हृदयसंपुटात जपून ठेवल्या आहेत.

वेळोवेळी त्यांनी लिहिलेली पत्रं… फोनवरून केलेली स्नेहाने ओथंबलेली संभाषणं…. त्यांनी पाठविलेली दुर्मीळ पुस्तकं… स्वतः आनंदी राहून दुसर्‍यांना आनंदित ठेवण्याची त्यांची ती जीवनशैली! … हे सारं सारं आज आठवतं!
या सर्वांमधून जाणवणारं त्यांचं मनस्वी व्यक्तिमत्त्व पुनः पुन्हा आठवतं. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली!