जोरदार पावसामुळे सतर्कता बाळगा

0
19

>> आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सरकारचे आदेश; पूरसदृश्य स्थितीवर लक्ष ठेवा

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोसळू लागलेला जोरदार पाऊस व त्यामुळे राजधानी पणजीसह विविध भागांत निर्माण झालेली पूरसदृश्यस्थिती आणि हवामान खात्याने ९ जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची व्यक्त केलेली शक्यता ह्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

काल यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हणाले की, राज्यात धो-धो कोसळू लागलेला पाऊस व त्यामुळे शहरांपासून राज्यातीतल ग्रामीण भागांपर्यंत जी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच पावसामुळे निर्माण झालेल्या व निर्माण होऊ शकणार्‍या स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यात जी पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे, त्या स्थितीवर सरकारचे लक्ष आहे आणि कोणतीही कठीण परिस्थिती उद्भवल्यास तिला तोंड देता यावे यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क राहावे अशी सूचना सरकारने केली आहे, असे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील बांबोळी, पाटो, कदंब पठार परिसर, ताळगाव, चिंबल आदी ठिकाणी पाणी साचून राहिल्याने सदर परिसर जलमय झाले होते. तिसवाडीबरोबरच पेडणे, डिचोली, मुरगाव, केपे, काणकोण, बार्देश आदी जवळपास सगळ्याच तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते व परिसर पाण्याखाली गेले होते. त्यातच हवामान खात्याने आता ९ जलैपर्यंत राज्याला जोरदार पावसाचा इशारा दिलेला असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.