जोकोविचने जिंकली इटालियन ओपन

0
106

सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने चाचपडत्या सुरुवातीनंतर स्वतःला सावरताना इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याचा ७-५, ६-३ असा पराभव केला. या कामगिरीसह त्याने ३६व्या एटीपी मास्टर्स किताबाला गवसणी घातली. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावरील खेळाडू असलेल्या जोकोविचने आपल्या पहिल्याच ‘एटीपी १०००’ अंतिम फेरीत खेळत असलेल्या श्‍वार्टझमन याच्याविरुद्धची सुरुवात खराब केली. पहिल्या सेटमध्ये श्‍वार्टझमन याने ३-० अशी आघाडी घेतली.

जोकोविचने सुरुवातीलाच बॅकहँडच्या अनेक चुका केल्या. पावसाच्या रिपरिपीमुळे जोकोविचला सातत्य राखणे कठीण गेले. परंतु, त्याने आपल्या दांडग्या अनुभवाच्या बळावर ३-३ अशी बरोबरी साधली. जोकोविचने यानंतर ‘बेसलाईन’ जवळच्या खेळावर लक्ष केंद्रीत केले. १२व्या गेममध्ये श्‍वार्टझमनची सर्व्हिस भेदत जोकोविचने पहिला सेट आपल्या नावे केला. तब्बल १८ टाळता येण्यासारख्या चुका करूनही जोकोविच या सेटमध्ये वरचढ ठरला. उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विजेत्या राफेल नदालला नमविलेल्या श्‍वार्टझमन याने दुसर्‍या सेटच्या प्रारंभीच ‘ब्रेक’ मिळविला.

पण, याचा फायदा उठवण्यात तो कमी पडला. जोकोविचने यानंतर श्‍वार्टझमनची सर्व्हिस दोनवेळा भेदली. जोकोविचला या सेटसह सामना जिंकण्यासाठी अधिक घाम गाळावा लागला नाही. फ्रेंच ओपन स्पर्धा पुढील आठवड्यापासून सुरू होत असून यंदाच्या मोसमात ३२ पैकी ३१ सामने जिंकलेला जोकोविच हा ‘लाल माती’वरील बादशाह राफेल नदाल व यूएस ओपन विजेत्या डॉमनिक थिम याच्यासह विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल.