Home बातम्या जून महिन्यात 13 टक्के कमी पाऊस

जून महिन्यात 13 टक्के कमी पाऊस

0

राज्यात जून महिन्यात एकूण 31.19 इंच पावसाची नोंद झाली असून, या महिन्यात मोसमी पावसाचे सरासरी प्रमाण 13 टक्के एवढे कमी नोंद झाले आहे. दरम्यान, चोवीस तासांत 0.68 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात जून महिन्यात पडझडीच्या मोठ्या प्रमाणात घटनांची नोंद झाली. राज्यात मे महिन्यात सुमारे 25 इंच ते 26 इंच अशा जोरदार पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जून महिन्यात जोरदार पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, जून महिन्यात मोसमी पावसाचे प्रमाण 13 टक्के कमी नोंद झाले आहे. राज्यात मोजकेच दिवस चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात धारबांदोडा येथे आत्तापर्यंत सर्वाधिक 44.06 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे 39.60 इंच, वाळपई येथे 38.62 इंच, फोंडा येथे 37.40 इंच, म्हापसा येथे 24.5 इंच, पेडणे येथे 31.06 इंच, पणजी येथे 28.49 इंच, जुने गोवे येथे 30.14 इंच, काणकोण येथे 32.95 इंच, दाबोळी येथे 20.77 इंच, मडगाव येथे 21.17 इंच, मुरगाव येथे 19.69 इंच आणि केपे येथे 31.73 इंच पावसाची नोंद झाली.दक्षिण गोव्यातील साळावली हे प्रमुख धरण 100 टक्के भरून वाहत आहे. गावणे धरण 100 टक्के भरले आहे. पंचवाडी धरण 91 टक्के भरले आहे. आमठाणे धरणात 6 टक्के पाणी आहे, तर सत्तरीतील अंजुणे धरण 29 टक्के भरले आहे. तसेच, तिळारी धरणामध्ये 71 टक्के पाण्याचा साठा आहे. राज्यात 15 जून ते 29 जून या 15 दिवसाच्या काळात 533 पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे. या काळात सुमारे 5 कोटी 97 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मध्य विभागात सर्वाधिक 42 टक्के, उत्तर विभागात 33 टक्के आणि दक्षिण विभागात 26 टक्के पडझडीच्या घटनांची नोंद झाली. तसेच मागील चोवीस तासांत पडझडीच्या 11 घटनांची नोंद झाली.