जुलैपर्यंत मास्कचा वापर बंधनकारक करा

0
21

>> कोविड तज्ज्ञ समितीकडून राज्य सरकारला शिफारस; चौथ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोविड तज्ज्ञ समितीची बैठक अध्यक्ष डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. या बैठकीत राज्यात येत्या जून-जुलैपर्यंत मास्कचा वापर कायम ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञ समितीकडून ही शिफारस करण्यात आली आहे.

राज्यात मास्कचा वापर बंद करता कामा नये, असे मत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोना महामारीची लाट साधारण चार महिन्यांच्या अंतराने येत असते. कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी महिन्याच्या मध्यास पूर्ण झाली आहे. चार महिन्यांचा कालावधी गृहित धरल्यास तो जून-जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे राज्यात आत्ताच मास्क वापरातून सूट देता कामा नये. तज्ज्ञ समितीच्या येत्या जून-जुलै महिन्यात होणार्‍या बैठकीत मास्क वापराबाबत फेरआढावा घेणार आहे. या बैठकीतील सूचना, शिफारशी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
राज्यातील लसीकरणाच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली असून, उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांबाबत लसीकरण नोडल अधिकार्‍यांशी चर्चा केली जाणार आहे, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

आयआयटी कानपूरने कोविड महामारीच्या चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाची चौथी लाट आल्यास आवश्यक वैद्यकीय साधनसुविधा तयार आहेत, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

सक्रिय कोरोना रुग्णसंख्या २६ वर
राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ३ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या २६ एवढी आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ४६९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील ३ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी २ जण कोरोना मुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४३ टक्के एवढे आहे.