राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला असून तो रोखण्यात सरकारी यंत्रणेला यश प्राप्त झालेले नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या महिन्यागणिक वाढत चालली आहे. ऑगस्ट महिन्याच्या ३० दिवसांत मागील जुलै महिन्याच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच ११ हजार ०७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७,००४ झाली आहे. तीस दिवसांत कोरोना विषाणूने १३८ जणांचा बळी घेतला आहे. तर, ८९७५ जण बरे झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या १३१८६ एवढी झाली आहे.
राज्यात सुरुवातीला सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. हे कोरोना रूग्ण बरे झाल्यानंतर कित्येक दिवस नवे रुग्ण आढळून आले नव्हते. केंद्र सरकारने राज्यांतर्गत वाहतुकीला मान्यता दिल्यानंतर १४ मे २०२० पासून राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले. रेल्वे, विमान, रस्ता मार्गाने गोव्यात प्रवेश करणारे प्रवासी, वाहन चालक, नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत होते. राज्यात ३१ मेपर्यत ७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. या महिन्यात १२४४ रुग्ण आढळून आले.
मांगूर हिल वास्को येथून स्थानिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येण्यास प्रारंभ झाल्यानंतर राज्यभरातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले. जुलै महिन्यात ४५९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. या महिन्याच्या ३० दिवसांत १० हजार ६२० कोरोना रुग्ण आढळून आले आहे.