जुने गोवे येथे काँग्रेसचा संकल्प सत्याग्रह

0
5

>> राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचा निषेध

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा खासदारपद रद्द करण्यात येऊन त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या निषेधार्थ काल गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जुने गोवे येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ संकल्प सत्याग्रह केला.
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व गोवा महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या सत्याग्रहात एम. के. शेख, माजी आमदार प्रताप गांवस, वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष ज्योएल आंद्राद, विजय भिके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जुझे फिलीप डिसिझा यांच्यासह अन्य कार्यकर्ते हजर होते.
यावेळी त्या नेत्यांनी ‘हाथ से हाथ हम जोडेगे, नफरत को हम तोडेंगे’ अशा घोषणा दिल्या.
या सत्याग्रहास राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. पक्षाचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांचे यावेळी आभार मानले.

त्यावेळी श्री. पाटकर यांनी, निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी यांना चोर म्हटले तर राहुल गांधी यांच्यावर केस दाखल केली जाते. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. महागाई, बेरोजगारी हे मुद्दे घेऊन ही यात्रा काढण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी भारतभरातल्या लोकांना एकत्र आणले. काँग्रेस पक्षातर्फे देशभर संकल्प सत्याग्रह सुरू आहे. देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. मात्र, खरे बोलले तर भाजपला ते आवडत नाही आणि ते सुडाचे राजकारण करुन विरेधकांवर गुन्हा दाखल करतात. राहुल गांधी यांनी, गौतम अदानीचे 20 हजार कोटी कोणाचे असे विचारले यात काय गैर आहे, असा प्रश्नही त्यांनी केला.