जुने गोवे चर्च आणि परिसराचे सौंदर्यीकरण करणार ः मुख्यमंत्री

0
149

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या योजनेतून अंदाजे ४७ कोटी रूपये खर्चून ओल्ड गोवा येथील पुरातन बासिलिका ऑफ बॉम जीजस चर्च आणि सभोवतालच्या परिसराचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सौंदर्यीकरणाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे, कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, स्थानिक सरपंच, चर्चचे व्यवस्थापनाचे पदाधिकारी आणि विविध सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

या चर्चचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे. केंद्रीय पर्यटन खात्याच्या टूरिझम सर्कीट योजनेखाली या वारसा स्थळाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याबाबत संबंधिताच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. अशी माहिती मुख्यमत्र्यांनी दिली.

चर्चच्या सौदर्यीकरणाचा आराखडा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे सादर करून तीन-चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ओल्ड गोवा येथे वाहन पार्किंग, स्वच्छतागृह, सभागृह, पदपथ, जेवणासाठी शेड आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला जाणार असून ओेल्ड गोव्यातील स्थानिकांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही, असे आमदार सोपटे यांनी सांगितले.