जीवोध्दारक : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

0
1908

 

नवप्रभेच्या २८ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात श्री. शंभू भाऊ बांदेकर यांचा ‘सर्वांगीण मानवी समानतेसाठी झटणारे चक्रधर स्वामी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. सदर लेखामध्ये काही चुकीचे उल्लेख लेखकाने केले होते. त्यासंदर्भात वाचकांच्या मनामध्ये परमपूज्य श्री चक्रधरस्वामींविषयी गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी पू. महंत प्रज्ञासागर बाबा महानुभाव यांचा हा स्पष्टीकरणात्मक लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत. श्री. बांदेकर यांच्या लेखामुळे कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचली असल्यास त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत..

chakradhar

 लेखक  – महंत श्री प्रज्ञासागर बाबा महानुभाव
संपादक : ‘महदंबा’ मासिक, श्रीक्षेत्र खणेप्ाुरी

जेव्हा काळरात्र होऊन सर्वत्र काळोख दाटतो व या काळोखात सकल प्राणीमात्र चाचपडायला लागतात, तेव्हा त्या काळोखाचा अंत करण्यासाठी क्षितिजावर सहस्त्रावधी प्रकाशकिरणांची उधळण करीत सूर्यबिंब उदयाला येते. त्याप्रमाणे अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला पमेश्वर भक्तीचा प्रकाश देऊन त्याचा उध्दार करण्यासाठी १२ व्या शतकात महाराष्ट्राच्या क्षितिजावर परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा उदय झाला व महाराष्ट्रीय समाज श्री चक्रधर स्वामींच्या अमृतमय ज्ञान प्रकाशाने उजळून निघाला.

 

१२ व्या शतकातील महाराष्ट्राची स्थिती

 

१२ व्या शतकात महाराष्ट्रातील काही वैदिक धर्मपुरोहितांनी समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे प्रचंड स्तोम माजविले होते. जैन-बौध्दादी क्षेपणिक मताचा पराभव करून समाजात वैदिक विचार रुजविण्याची लाट आली होती. द्वैत-अद्वैत-विशिष्टाद्वैत या तात्त्विक व समाजाच्या गळी न उतरणार्‍या धर्मचर्चा बाजूला ठेवून तत्कालीन धर्मपुरोहितांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था अधिक क्रुरतेने समाजात रुजविली होती. गीतेत सांगितलेली गुणकर्माधारित वर्णाश्रम व्यवस्था झुगारून देऊन जन्माधारित वर्णाश्रम व्यवस्था समाजात प्रस्थापित करण्यात प्ाुरोहित वर्ग यशस्वी ठरला होता. जातीय बंधने कठोर करून तथाकथित शुद्रांना – अस्पृशांना धर्माची दारे बंद करून त्यांना गावाबाहेर हाकलून देण्यात आले होते. माणूस असूनही त्यांना माणसासारखी वागणूक नाकारली होती. गार्गी-मैत्रेय या स्त्रियांनी सुरू केलेली धर्मग्रंथ अध्ययन-अध्यापनाची परंपरा खंडित करुन स्त्रियांना धर्मग्रंथ अध्ययनाचा व अध्यापनाचा अधिकार नाकारण्यात आला होता. स्त्रियांना संन्यास घेण्याचा व धार्मिक विधी करण्याचा अधिकार नव्हता १२ व्या शतकात स्त्रियांना व तथाकथित अस्पृश्यांना व शुद्रांना कुणीही त्राता उरला नव्हता. कर्मठ लोक धर्मग्रंथांचा आधार सांगून त्यांचे शोषण करीत होते. कर्मकांड व आसूरी देवतांच्या तामस भक्तीचे स्तोम समाजात वाढत होते व समाजाला अंधाराच्या खोल खोल गर्तेत ढकलत होते. हा अवघा जणू ठकवला जात होता. परमेश्वराचा सत्य धर्म बुडून गेला होता. देवगिरीच्या यादव राजाने ब्रम्हसानू, हेमाडपडींत, महदाश्रम या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे कट्टर प्ाुरस्कर्ते असलेल्या पंडितांना राजाश्रय दिला होता. त्यामुळे जातीव्यवस्थेचे पाश समाजा भोवती गच्च-गच्च आवळले जात होते. कर्मकांडे व जातीय विषमतेने समाज रसातळाला गेला होता. माणसाला माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार उरला नव्हता.
अशा या धार्मिक, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर श्री चक्रधर स्वामींचे महाराष्ट्रात जीव उध्दरण्याच्या हेतूने आगमन झाले होते. गुजराथ मध्ये भरवस नगरात विशालदेव राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव माल्हणी. यांचा सुप्ाुत्र हरिपाळ देव. हा राजपुत्र वयाच्या २१ व्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यू पावला. त्याचे कलेवर (मृत शरीर) स्मशानात आणले. सरणावर ठवून प्रेताला अग्नी देतेसमयी मृत हरिपालाचे पतीत उठवून श्री चांगदेव राऊळ या ईश्वर अवताराने घेतलेला प्ाुनर्अवतार म्हणजेच श्री चक्रधर स्वामी होत. त्याचा प्ाूर्ववृत्तांत असा-

 
पूर्ववृत्तांत

 
फलटण येथे श्री चक्रपाणी उर्फ श्री चांगदेव राऊळ हे परमेश्वराचे अवतार झाले. त्यांनी माहूर येथे जाऊन श्री दत्तात्रेय प्रभूंपासून ज्ञानशक्ती स्विकार केली व नंतर ते द्वारावतीला (द्वारका) येऊन राहिले येथे त्यांनी ५४ वर्ष अवतारकार्य केले. द्वारावतीचे रस्ते झाडून केर, कचरा सुपामध्ये भरत व तो कचरा गोमती नदीकडे नेऊन टाकीत. अशा प्रकारे स्वच्छतेच्या माध्यमातून जीवांचा उद्धार करण्याचे व्रत या ईश्वर अवताराने स्वीकारले होते. दर्शनाला येणार्‍यांना ते मोठा विलक्षण आशीर्वाद देत. डोक्यावर सूप ठेऊन वरून ते खराट्याने रट्टा देत. त्यांच्या या विलक्षण कृतीतून त्या मनुष्याला विद्या प्राप्त होई. अशाप्रकारे रोज ५२ प्ाुरुषांना ते विद्या देत. श्री चांगदेव राऊळ विरक्त व नैष्ठिक ब्रम्हचर्यव्रत पाळणारे दिव्य योगी ईश्वर प्ाुरुष होते. त्यांची कीर्ती ऐकून कामाख्या नावाच्या काऊरुळ
देशाच्या हटयोगिनीला त्यांची परिक्षा पाहण्याची इच्छा झाली व ती द्वारकेला आली. तीने रतीक्रिडेची याचना केली. श्री चांगदेव राऊळांनी तिला आपण ब्रम्हचर्याची प्रवृत्ती धारण केली असल्यामुळे आपण ही तिची इच्छा प्ाूर्ण करु शकत नाही असे सांगितले, परंतु ती ऐकायला तयारच नव्हती. ती श्री चांगदेव राऊळांच्या गुंफेच्या दारात सात अहोरात्र हट्ट धरुन बसली. तिचा तो हट्ट पाहून श्री चांगदेव राऊळांनी आपल्या मायापुराचा (शरीराचा) त्याग केला व गुजरातमधील भडोच येथील स्मशानात आणलेले राजपुत्र हरीपाळ देवाचे मृत शरीरात प्रवेश करुन पुनर्अवतार घेतला, असे मानले जाते, तेच श्री चक्रधर स्वामी होत.
अशा प्रकारे गुजराथच्या राजप्ाुत्र हरीपाळ देवाचे पतीत उठवून अवतार घेतलेले श्री चांगदेव राऊळ आपले अवतार कार्य करण्यासाठी महाराष्ट्राच्या दिशेने चालू लागले. प्रवास करीत ते वर्‍हाड प्रांतातील ऋध्दप्ाूर येथे आले. ऋध्दप्ाूर येथे श्री गोविंद प्रभू हे अवतार त्या काळात वास्तव्य करुन राहात होते. त्यांचे दर्शन घेऊन त्यांचेकडून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला व त्यांना गुरू मानले. श्री गोविंदप्रभूंनी त्यांना जीव उध्दरण्याची दिक्षा दिली व ‘‘श्री चक्रधर’’ हे नाव ठेवले. इथून प्ाुढे श्री चांगदेव राऊळ हे ‘‘श्री चक्रधर स्वामी’’ या नावाने प्रसिध्दीस आले. या व्यतीरीक्त गोसावी, सर्वज्ञ तर क्वचित प्रसंगी श्री चांगदेव राऊळ या नावानेही ते ओळखले जाऊ लागले. परंतु श्री चक्रधर हेच नाव सर्वत्र प्रचलित झाले.

 

एकांती परिभ्रमण

 

ऋध्दप्ाूर येथे श्री गोविंद प्रभूंकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर श्री चक्रधर स्वामी सालबर्डीच्या सातपुडा पर्वतावर गेले. या पर्वतामध्ये त्यांनी मौन धारण करुन १२ वर्षे व्यतीत केली. त्यानंतर झाडी गोंडवाडा, ओरंगल, आंध्रपद्रेशात गेले. तेथील गोंड, आदिवासी लोकात रमले. त्यांचे एकाकी परिभ्रमण अनेक दृष्टींनी समृध्द आहे. आपल्या या भ्रमंतीच्या आठवणी स्वामींनी भक्तजनांना वेळोवेळी सांगितल्या आहेत. पैठण येथे नागुबाईसा ही भक्त त्यांना अनुसरली व येथून प्ाुढे त्यांचे लोकांतात आगमन झाले.

 

श्री चक्रधर स्वामींचे ईश्वरत्व

 

श्री चक्रधर स्वामी साक्षात परमेश्वराचे अवतार होते व जीवांच्या उध्दारासाठी त्यांनी अवतार घेतला होता, हे स्वत: श्री चक्रधर स्वामीच सांगतात. डोमेग्राम येथे म्हाईंभट्टाच्या प्रथम भेटीच्या प्रसंगी जो वाद झाला, त्याच्या शेवटी स्वामींनी निराकार परमेश्वर साकार होऊन अवतरतो व जीवांना आपले जे दास्य देतो ते दास्य मोक्षदायक आहे हा सिध्दांत सांगितला. त्यावर ‘‘तो कोण?’’ या म्हाईंभट्टांच्या प्रश्‍नाला उत्तर देत स्वामी स्वत:वर आले आणि ‘‘सन्निधान ते कैसे’’ या त्यांच्या प्रश्‍नावर ‘‘ते ऐसे’’ असे म्हणून त्यांनी स्व:ताकडे बोट दाखविले. इतकेच नव्हे तर ‘‘जीवासी बोधू आणि बोध शक्ती ते येथूनीची की’’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले (लीळाचरित्र उत्तरार्ध ११३). आपण ‘‘दाणी’’ म्हणजे दाते आहोत हे सांगतांना स्वामी म्हणतात -‘‘येथ दाणी नसे तर असे कव्हणे ठाई’’ असे त्यांनी अन्य प्रसंगीही सुचविले आहे (लीळाचरित्र उत्तरार्ध). तसेच एकदा ‘‘विश्रांत चैतन्य ते हे’’ असे त्यांनी आपली मांडी थोपटून सारंगपंडिंतांना सांगितले (लीळाचरित्र उत्तरार्ध ३४९) शेवटी उत्तरापंथे गमन करण्याच्या प्रसंगी आऊसा त्यांच्या विनवण्या करू लागली, तेव्हा ते तिला म्हणाले -‘‘पोरे हो : एने काई तुमचेची करावे? अनंत जीवांच्या सातर्‍या पसरलेल्या असतात. त्यांचा उध्दार करणारा काय आणखी कुनी देव आहे ?’’ (लीळाचरित्र उत्तरार्ध ४८६). वरील सर्व उद्गार त्यांच्या ईश्वरत्वाचेच द्योतक आहे.
स्वत:च्या ईश्वरत्वाच्या सामर्थ्याची जाणीव श्री चक्रधर स्वामी ठाई ठाई करुन देतात, हे लीळाचरित्रात पहावयास मिळते. एकदा प्रवासात जवळचा दाम संपल्याचा बाईसा तक्रार करते. तेव्हा स्वामी तिला म्हणतात -‘‘ येथ जर प्रवृत्ती होय तरी हे अवघी हाटी सोनेयाची न किजे? येथ तैसी प्रवृत्ती नाही की’’ (ली. पृ. ८७). तसेच भूतयोनी व तिचे सामर्थ्य मान्य करून त्या सामर्थ्याचे श्रेय त्यांनी स्वत:कडे घेतले आहे. ते म्हणतात -‘‘तयाचा (म्हणजे भुताच्या) ठाई एक सामर्थ्य असत ते तरी येथोनीची सीध्दी नेईजती किगा :’’ (ली. उ. ११). एकदा आऊसेने एका कुत्र्याला दगडाने मारले तेव्हा त्या कुत्र्याची व्यथा स्वामींच्या ठाई उमटलेली पाहून तिने त्यांना विचारले -‘‘आपण काई सर्व व्यापक होईजैल ?’’ त्यावर स्वामींनी ‘‘होय’’ असे उत्तर दिले.
आपले खरे स्वरुप, म्हणजेच आपले ईश्वरत्व आपण जाणविल्या वाचून कोणाला कळणारही नाही असे श्री चक्रधर स्वामी स्वत: बाबत सांगत. एकदा बळ्हेगावच्या महाजनांत त्यांच्या ईश्वरत्वाविषयी चर्चा चाललेली असतांना श्री चक्रधर स्वामी जाणोपाध्यांना म्हणाले की, ‘‘ते तयांचे पर किगा :’’ म्हणजे माझे खरे स्वरुप त्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे (ली. प्ाू. ३२१). म्हणूनच एकदा याच बळेगावच्या देवळातील चाटे मंडळिंचे अमर्यादपणाचे वागणे त्यांच्या भक्तांना बरे वाटले नाही. तेव्हा त्यांची समजूत घालतांना स्वामी त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, त्या चाट्यांना ते कसे ठाऊक असणार ? त्यांच्या दृष्टीने आम्ही सामान्य मनुष्य ! कारण ‘‘हे अगाधाचे अगाध’’ आहे. म्हणजे आमचे खरे स्वरुप अगम्य, अतर्क्य आहे (ली. प्ाू. ३११). श्री
चक्रधर स्वामींच्या ठाई अनंत शक्तींचा व कलागुणांचा आढळ होता. किंबहूना ते ‘‘सर्वज्ञ’’ होते व या सर्वज्ञते मुळेच ते परमेश्वराचे अवतार होते हे लीळाचरित्रातील वरिल प्रसंगातून दिसून येते.

 

श्री चक्रधरांच्या वाणीचे माधुर्य !

 

श्री चक्रधर स्वामींची वाणी मधुर व रसाळ होती. त्यांची श्रीमुर्ती ३२ लक्षणांनी युक्त सुंदर होती. त्यांच्या ठाई अप्ाूर्व अशी वेध शक्ती होती. या वेधशक्तीमुळे माणसेच काय पशू-पक्षी ही त्यांच्याकडे वेधत असत. अशाच एका प्रसंगी स्वत: श्री चक्रधर स्वामींनीच म्हटले आहे. ‘‘येथ माणूसे तरी माणूसे : गोरुवे तरी गोरुवे : पाखिरुवे तरी पाखिरुवे वेधीती :’’ (लीळाचरित्र प्ाुर्वार्ध ४८५). असा हा वेध शक्तीने नटलेला परमेश्वर अवतार त्या काळात महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यातून, हाळिया-पाळियातून, झाडी-गोंडवाड्यातून जिवाच्या उध्दाराचे व्यसन लावून घेऊन फिरत होता. त्यामुळे त्या काळातील समाज स्वामींकडे आकृष्ट झाला होता- वेधला होता.

 

श्रीचक्रधर स्वामींचे निरूपण

 

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात जिवाच्या उध्दारासाठी फिरत होते. आपल्या रसाळ व मधुर वाणीने १८ पगड जातीतील अधिकारी जिवांना
निरूपण करीत होते. त्यांच्या निरूपणातून एक अभिनव तत्वज्ञान महाराष्ट्रात आकाराला येत होते. त्या निरूपणाचा सार असाजीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे चार नित्य पदार्थ आहेत. पाचवा अविद्या हा पदार्थ अनादी आहे, परंतु नित्य नाही.
१) जीव स्वरुप : जीव हे अनंत असून अनादी व नित्य आहेत. ‘‘नित्य : केवळ : अनादी : अविद्यायुक्त वस्तू एक आती ते जीव शब्द बोलीजे :’’ (महावाक्य २). या व्याख्येत जीव या पदार्थाचे स्वरुप प्रकट होते. हे जीव स्फटिका प्रमाणे शुभ्र असले तरी अनादी अविद्येने त्यांचे शुभ्रत्व युक्त आहे. ते पाहिजे तसे रंग घेऊ शकतात. या शिवाय जीवाच्या ठाई अधमती, अधगती, अधरती हे मतीत्रय आहेत. तसेच विशुध्द अशा जीव स्वरुपावर अनादी अविद्या, अज्ञान, अन्यथाज्ञान, जीवत्व व आदिमूळ या पाच पिशी आहेत. तसेच विकार, विकल्प व स्वभाव हे तीन दोष आहेत. त्याचे मूळ अनादी अविद्या हेच आहे. वरील गुण-दोषाने युक्त असलेला जीव माया स्वरुपातील तम प्रदेशात अनादी काळापासून जडवत पडून होता. सृष्टी रचनेच्या वेळी परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायेने त्याला
आपल्या स्वरुपाचा एक अंश दिला. हा चैतन्य मायेचा अंश त्या जिवाला मोक्ष मिळे पर्यंत चिकटून राहतो. त्याला ‘‘संलग्न’’ असे म्हणतात. हा जीव या संलग्नाच्या चेष्टकत्वाने कर्म करतो. त्या कर्माचे कर्तृत्व व त्याचा सुखदु:खोपभोग जीवाकडेच येतो.
२) देवता चक्र : श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेल्या चार नित्य पदार्थां पैकी देवता हा दुसरा पदार्थ आहे. या देवता अनेक आहेत. त्या सर्व देवतांचे मिळून एक देवता चक्र आहे. ते चक्र इतके प्रचंड आहे की, श्री चक्रधर स्वामींनी म्हटल्या प्रमाणे त्याचे निरूपण करण्यास ‘‘पृथ्वी एसणे कडीत (म्हणजे पाटी) आणि मेरु एसणी खडी (म्हणजे खडू) प्ाुरणार नाही’’ (विचार-२७०). स्री देवता व प्ाुरुष देवता दोन्ही प्रकारच्या देवता आहेत. इंद्र, चंद्र, हरी, हर, ब्रम्हा, शेषशय्या इ. प्ाुरुष देवता आहेत. तसेच ‘विश्व’, ‘चैतन्य’ (म्हणजे माया) या स्री देवता आहेत. प्रत्येक ब्रम्हांडात ८१ कोटी सव्वा लक्ष १० देवता आहेत.
त्यांचे ९ थोवे आहेत. ते असे-
१) कर्मभूमीच्या देवता : १३ कोटी, २) अष्टोदेव योनिच्या देवता : १३ कोटी, ३) अंतराळीच्या देवता : १३ कोटी, ४) स्वर्गीच्या देवता : ३३
कोटी, ५) सत्य-कैलास-वैकुठिच्या देवता : ९ कोटी, ६) क्षिराब्दीच्या देवता : सव्वा लक्ष, ७) अष्टभैरवच्या देवता : ८, ८) विश्व : १, ९) माया (चैतन्य) : १ (अन्यव्यावृत्ती, सुत्रपाठ). कर्मभूमीची देवता सर्वात निच आहे. तर चैतन्य माया ही देवता सर्वात उच्च देवता आहे. या देवतांच्या ठाई १) ज्ञान, २) सुख, ३) सामर्थ्य, ४) ऐश्वर्य व ५) प्रकाश हे पंच प्रकार आहेत. चैतन्य माया ही सर्वोच्य देवता असून खालील सर्व देवतांना व्याप्ाून आहे. देवता नित्यबध्द आहेत.
देवतांचे मुख्य कार्य म्हणजे जिवांना त्यांच्या कर्माची फळे देणे.
३) प्रपंच पदार्थ : श्री चक्रधर स्वामींनी तिसरा नित्य पदार्थ प्रपंच सांगितला आहे, कारण प्रपंच व कार्य प्रपंच असे प्रपंचाचे दोन प्रकार आहेत. कार्यप्रपंच हा कारण प्रपंचा पासून कार्याला आला आहे. कारण प्रपंच हा नित्य आहे. कार्य प्रपंच हा अनित्य आहे. हा पदार्थ अष्टभैरवाच्या स्वरुपाच्या आधाराने राहतो.
४) परमेश्वर : परमेश्वर हा ४ था नित्य पदार्थ आहे. परमेश्वर म्हणजे मायेच्याही पर म्हणजे पलीकडे आहे. चैतन्य मायेच्या अलीकडे ज्या देवता आहेत. त्या ‘अवर’ या प्रकारात मोडतात तर चैतन्य मायेच्या पलीकडे सदब्रम्ह व ईश्वर हे ‘पर’ विभाग होय. परमेश्वराला जीव उध्दरण्याचे व्यसन आहे. हाच परमेश्वर चैतन्य मायेकरवी सृष्टी रचना करुन या कर्मभूमीत अवतार घेतो व जिवाला ज्ञान व प्रेमाचे दातृत्व करुन जीवांचा उध्दार करतो. परमेश्वरच्या आज्ञेने चैतन्यमाया या देवतेने सृष्टीची रचना केली आहे. जिवांना या सृष्टीत आणून त्यांना कर्मबंधनात टाकले आहे. त्या जिवांच्या उध्दारासाठी परमेश्वराने या कर्मभूमीत अवतार घेतला आहे.

 
परमेश्वराचे पाच अवतार

 
परमेश्वर अवतारांची ओळख करून देताना श्रीचक्रधर स्वामी म्हणतात- १) व्दापर युगीचे श्रीकृष्ण चक्रवर्ती, २) सह्याद्रीचे श्री दत्तात्रेय प्रभू, ३) द्वारावतीयेचे श्री चांगदेव राऊळ, ४) ऋध्दप्ाूरचे श्री गुंडम राऊळ व ५) प्रतीष्ठाणचे श्री चांगदेव राऊळ अर्थात स्वत: श्री चक्रधर स्वामी (पंचकृष्ण सुत्रपाठ). या पाच परमेश्वर अवतारांचे दास्य, भक्ती केली असता हा जीव अविद्या बंधनातून मुक्त होऊन ईश्वर स्वरुपात मिसळून जातो. व कैवल्याचा मोक्ष आनंद भोगतो. या विरहित जे जीव देवतांचे कर्मकांड आचरण करतात, ते देवता चक्रात गुरफटून जातात व प्ाुन्हा: प्ाुन्हा: जन्म-मृत्युच्या व सुख-दु:खाच्या भव चक्रात सापडून चौकडीचे नरक भोगतात. म्हणून देवता भक्तीचा त्याग करुन जिवाने परमेश्वराला अनुसरावे व परमेश्वर अवताराची दास्य-भक्ती करावी, असा श्री चक्रधर
स्वामींच्या निरूपणाचा मथितार्थ होता. स्वामी श्री चक्रधरांच्या या तत्वज्ञानामुळे त्या काळातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे प्ाुरस्कर्ते कर्मठांंचा जळफळाट होणे स्वाभाविक होते. त्यांची धर्मव्यवस्था कोसळू लागली. श्री चक्रधर स्वामींच्या निरूपणाने महाराष्ट्रातील विद्वानांचा एक वर्ग स्वामींकडे आकृष्ट होऊ लागला.

 
श्री चक्रधर स्वामींनी स्त्री-शुद्रांनाही दिला ईश्वर भक्तीचा अधिकार !

 
श्री चक्रधर स्वामी ईश्वराचे अवतार होते. जीव उध्दरण हे त्यांचे व्यसन होते. त्यामुळे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, स्री-प्ाुरुष, आदिवासी, गौंड, भिल्ल व सर्व मानव त्यांच्या दृष्टीने जीवच होते. या जीवांचा उध्दार करणे हे त्यांचे अंगिकृत अवतार कार्य होते. म्हणून श्री चक्रधर स्वामी कुठलाही उचनिचतेचा, स्पृश्य-अस्पृश्यतेचा भेदभाव न करता सर्व अधिकारी जीवांना ब्रम्हविद्या शास्त्राचे निरूपण करीत होते. स्त्रियांना, शुद्रांना, अस्पृशांना ब्राम्हणाच्या पंगतीत बसवून त्यांना समतेचा व बरोबरीचा अधिकार देत होते. ही त्या काळात अतिशय क्रांतिकारी अशी घटना होती. तत्कालीन धर्म पंडीतांनी समाजावर लादलेल्या चातुर्वर्ण्य जाती व्यवस्थेवर व देवता जनीत कर्मकांडावर हा वज्रप्रहार होता. त्यामुळे देवगीरीच्या यादवराजाचे आश्रीत असलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांना स्वामींचा धाक वाटू लागला. आता हे श्री चक्रधर स्वामी ‘‘आमुचा मार्ग उच्छेदिती’’ अशी त्यांना भीती वाटू लागली व ते स्वामींच्या विरोधात उभे राहिले. मातंगाने दिलेला लाडू ब्राम्हण अनुयायांना वाटला !
सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या व ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या जातीय उतरंडीमध्ये बंदिस्त झालेल्या सर्व जातीतील मानवाला एकत्र आणून श्री चक्रधर स्वामींनी समतेचा मंत्र ममतेने शिकविला. त्र्यंबकेश्वर, पैठण, कटक देवगीरी ही कर्मकांडी ब्राम्हणांच्या बलस्थानाला स्वामींनी हादरा दिला. जोगेश्वरी येथे मातंगाने अर्पण केलेला लाडू स्वीकार केला. ही घटनाच त्या काळात क्रांतीकारी होती (लीळाचरित्र उत्तरार्ध ७२). अस्पृश्य मानल्या गेलेल्या मातंगाचा स्पर्श सुध्दा अपवित्र माणनार्‍या कडकडीत सोवळ्याच्या ब्राम्हणांना ही घटना म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी केलेला फार मोठा धर्मद्रोह वाटत होता. स्वामी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मातंगाच्या हातचा लाडू ब्राम्हणांमध्ये प्रसाद म्हणून वाटला. ही घटना ब्रम्हसानू, हेमाडपंडित, महदाश्रम या कर्मठ ब्राम्हणांच्या
जिव्हारी लागली. श्री चक्रधर स्वामी स्त्री-प्ाुरुषांना कोणताही भेदभाव न करता शास्त्र निरूपण करीत होते. हे सारंगपंडित नावाच्या ब्राम्हणाला खटकले होते. त्याच्या मनातील भाव जाणून श्री चक्रधर स्वामी त्याला खडसावून म्हणाले -‘‘हां गा, तुमचे जीव : मग याचिया (स्त्रियांच्या) काई जीवलीया ? स्त्रियांना तुम्ही तुच्छ का समजता ? त्यांचा व तुमचा जीव सारखाच आहेना. बरे तुम्हा प्ाुरुषांना अन् देव राखतो अन् त्या स्त्रियांना अन् देव राखतो असे नाही.’’ (लीळाचरित्र उत्तरार्ध १०२). अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामींनी भक्तीच्या क्षेत्रात स्त्री-प्ाुरुष समानतेचे तत्त्व सांगितले. स्वामी सर्व जीवांच्या उध्दाराचा व कल्याणाचा विचार करीत होते. वर्णभेद, जातीभेद, लींगभेद याच्या पलीकडे जाऊन फक्त जीव या दृष्टीने ते सर्वांकडे पाहत होते. ‘‘चातुर्वण्यं चरेत्‌भैक्षं या शास्राशी अनुसरीजे’’ (सुत्रपाठ आचार ८१) किंवा ‘‘महारवाडाहूनी धर्म काढावा’’ (सुत्रपाठ आचार १४९) या वचनातून त्यांची हीच दृष्टी प्रगट होते. वरील विवेचनाचा निष्कर्ष असा की, श्री चक्रधर स्वामी चातुवर्ण्य काय किंवा स्पृश्य-अस्पृश्यत्व काय या दोहींच्या पलीकडे होते. ‘‘हे काई ब्राम्हण : की क्षेत्री : की वैश्य : की शुद्र हे नेणीजे की:’’ असे त्यांनी म्हटलेही आहे. (लीळाचरित्र प्ाूर्वार्ध २४८) या वरुन श्री चक्रधर स्वामींच्या कार्यामुळे कर्मठ व सनातनी ब्राम्हण प्ाुरोहितांच्या मनात ‘‘हा आमुचा मार्ग उच्छेदीती’’ अशी धास्ती निर्माण झाली होती. हे सत्य होते.

 
अहिंसावादी श्री चक्रधर स्वामी!

 
श्री चक्रधर स्वामी हे अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक होते. एकदा सातपुडा पर्वतावर काही पारधी सश्याची शिकार करण्यासाठी सश्याचा पाठलाग करीत असताना तो ससा स्वामींच्या मांडीखाली येऊन लपला. ते पाहून पारधी स्वामींना म्हणाले-‘‘जी जी, हा ससा पैजेचा आहे. याची जो शिकार करील तो आमचा नायक म्हणून आम्ही निवडणार आहोत. तरी हा ससा सोडून द्यावाजी’’ तेव्हा स्वामी त्या पारध्यांना म्हणतात- ‘‘हिंसा करणे पाप आहे. पापामुळे नर्क होतात. प्राण्यांची हत्या करू नका. हा ससा आम्हाला शरण आला आहे. आम्ही त्याला मरण देणार नाही. त्याचे आम्ही संरक्षण करू.’’ या शब्दांत त्यांनी सश्याला अभय दिले. (लीळाचरित्र एकांक २३) असेच एकदा मठात इंगळी निघाली. ते पाहून आऊसाने त्या इंगळीला मारले व मठाच्या बाहेर नेऊन टाकले, ते पाहून श्री चक्रधर स्वामी आऊसाला म्हणतात- ‘‘ तुम्ही महात्मे किंगा : तुम्ही सर्व भूता अभय देयावे की’’ (ली. उ. ३९). एकदा भक्ती जनांनी गुंफेसाठी खड्डा खोदला. तो खड्डा मुंग्यांनी भरुन गेला. स्वामींनी भक्तीजनांना दुसरा खड्डा खोदण्यास सांगितले व म्हणाले- ‘‘यथीची सेवा ते भूता अविरोधे करावी किंगा’’ अर्थात आमची सेवा करतांना किडा-मुंगीची हिंसा होणार नाही याची काळजी घ्या. असे स्वामी भक्तजनांना स्पष्ट सांगतात (लीळाचरित्र उत्तरार्ध ७१). बाण हे
घातक शस्त्र आहे. कुणाच्या हाती हा बाण पडला तर त्या बाणाने तो एखाद्याची हत्या करेल. त्या हत्येला बाण उपलब्ध करुन देणारा निमित्त होईल म्हणून पाईकाचा बाण हिंसेचे साधन होईल म्हणून श्री चक्रधर स्वामींनी तो बाण मोडून प्ाुरुन टाकायला सांगितला (लीळाचरित्र उत्तरार्ध १०६). श्री चक्रधर स्वामी भक्तांना आदेश करतात की, हिंसा करु नका. हिंसा केल्या मूळे पाप लागते व पापामुळे नर्क होतात. स्वामी एका ठिकाणी म्हणतात- ‘‘तुमचेनी मुंगी रांड न व्हावी’’ (आचार ६०, ली. उ. १३६). म्हणजे मुंगीची सुध्दा हिंसा करु नये. हातावर गरम गरम अंबील वाढणार्‍या बाईवर क्रोधित होऊन त्या घरालाच आग लावणार्‍या घोडाचुडी नामक संन्याशाची साथ-संगत स्वामींनी सोडून दिली व ऋध्दप्ाूरला श्री गोविंद प्रभूंच्या संगतीला निघून आले (ली. उ. ३६). मठातील झोळी घेऊन पळणार्‍या कुत्र्याच्या टाळक्यात आउसा नावाच्या भक्ताने दगड मारला व ते कुत्रे वेदनेने विव्हळू लागले. तेव्हा दयाघन श्री चक्रधर स्वामींचे अंत:करण कळवळले व दु:खावेगाने ते आऊसाला म्हणतात- ‘‘नायका, तुम्ही त्या कुत्र्याला दगड का मारला ? त्याला का दुखविले?’’ तेव्हा आऊसा कुत्र्याने झोळी पळविली म्हणून दगड मारला असे उत्तर देतात. त्यावर स्वामी म्हणतात – ‘‘आहो, या बिचार्‍या कुत्र्याची कोणी माय-बहिण आहे काय ? मग हे त्यांचेकडे जाऊन जेवण करेल? अहो विचार करा आपल्या पोटासाठी अन्न मिळविणे त्याला भागच आहे. त्यासाठी त्याला धडपड करावीच लागणार आहे. आपण आपली झोळी सांभाळून ठेवली नाही हा आपला दोष नाही काय ? आपण आपली वस्तू सांभाळून ठेवली असती तर त्याने ती पळविली असती काय ? आपण चूक करायची व त्याला दगड मारायचा हे चुकीचे आहे. प्राणीमात्रांना उपद्रव देऊ नये’’ (लीळाचरित्र उत्तरार्ध ५०/५१). अशा प्रकारे श्रीचक्रधर स्वामी हे अहिंसेचे सागर होते. सर्व प्राणी मात्रांना अभय द्यावे, कुणालाही दुखवू नये, सर्वांशी प्रिय बोलावे, परमप्रीतीने वागावे. किडा, मुंगी, पशू,पक्षी, तृण, झाड हे सर्व सजीव आहेत त्यांची हिंसा करु नये. अहिंसा धर्माचे पालन करावे असा श्री चक्रधर स्वामींचा उपदेश असे.

 
श्री चक्रधर स्वामींची परधर्म सहिष्णूता !

 
श्री चक्रधर स्वामी हे सर्वांच्या मताचा सन्मान करीत. एकदा एका भक्ताने बुध्द ही देवता सामान्य व तुच्छ आहे असे म्हटले, तेव्हा स्वामी त्याला म्हणतात – ‘‘वैरियाचा देवो जाला तरी काई दगडे फोडावा ?’’ आपला वैरी असला तरी पण त्याच्या श्रध्दास्थानाचा सन्मान करावा. त्याच्या प्ाूजास्थळाचा अपमान करू नये. असे श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तांना सांगत असत (लीळाचरित्र प्ाूर्वार्ध १८५). स्वामींचा कट्टर विरोधक महदाश्रम याचा उल्लेख भट्टोबासांनी चेष्टेच्या सुरात केल्याचे पाहून स्वामी त्यांना म्हणतात – ‘‘तुम्ही महात्मे आहात, तुम्हा मारिता प्ाुजीता समाणची होआवा की’’ (ली. उ. ४३९).  पद्मनाभी नावाच्या एका शिष्याने परमानूभव देवाचा अपमान केला, हे श्री चक्रधर स्वामींना मान्य झाले नाही. ते म्हणतात – ‘‘हा (पद्मनाभी) प्राणीयाचे चैतन्य पोळवूनी आला असे : आता बाहेरी घाला’’ व त्या पद्मनाभीला स्वामींनी मठात प्रवेश नाकारला (ली. उ. १७४). डखले नावाचा एक मुलगा देवता प्रतिमेच्या बेंबीत करंगळी घालून त्या देवता प्रतिमेचा अपमान करतो. प्ाुजार्‍याने त्याला अडवले असता त्यालाही उलट-सुलट बोलतो, ही तक्रार तो प्ाुजारी स्वामीं समोर करतो. तेव्हा स्वामी डखल्याला उपदेश करतात – ‘‘ऐसे न म्हणीजे कि गा डखलेया : देवतेस निरोध होय ऐसे न किजे की’’ कोणत्याही देवतेचा अपमान होईल असे वर्तन करू नये. श्री चक्रधर स्वामी हे सर्वांचा विचार करणारे सहिष्णू वृत्तीचे होते. विरोधकांना सुध्दा ते सन्मानाची वागणूक देत. परधर्म व परमत सहिष्णूता हा त्यांचा स्वभाव होता.

 

समारोप

 

महाराष्ट्रामध्ये श्री चक्रधर स्वामींनी अखंड परिभ्रमण करुन आपल्या रसाळ व मधूर वाणीने सर्व जाती वर्णातील स्री-प्ाुरुषांना सत्य धर्माचे सार निरोपण केले. सत्य, सदाचार, अहिंसा, समानता, बंधुभाव, परोपकार, मानवता या नीतीमूल्यांचा अंगीकार करुन परमेश्वर अवताराची भक्ती करावी, परमेश्वराला अनुसरावे व कैवल्यपद प्राप्त करावे. असा ते साध्या व सुलभ भाषेत अखिल मानव जातीला सत्य ईश्वर धर्माचा मार्ग दाखविला. त्यांच्या या वेधक निरुपणामुळे त्यांचे गावो-गावी भक्त वाढू लागले. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, गोंड, भिल्ल आदिवासी, पारधी त्यांचे भक्त होऊ लागले. त्यांच्या सान्निध्यात येऊ लागले. त्या काळातील चातुर्वर्ण्य व्यवस्था व देवता कर्मकांडांचा पाठीराखा प्ाुरोहित वर्ग स्वामींच्या या लोकप्रियतेने चवताळून उठला व श्री चक्रधर स्वामींचा घात करण्याचे कारस्थान करू लागला. त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करुन समाज मनातून त्यांची लोकप्रियता प्ाुसण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु समाजाच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या श्री चक्रधर स्वामींचा घात करणे तितके सोपे नव्हते. १२ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाज स्वामींचा चाहता झाला होता. लोकांचा हा कल पाहून देवगिरीचा यादवराजा सुध्दा श्री चक्रधर स्वामींची प्रशंसा करु लागला. हेमाद्री, ब्रम्हसानू व महदाश्रम या त्रयींनी श्री चक्रधर स्वामींवर यंत्रासण प्ाूजा व विष प्रयोग करुन स्वामींना या जगातून संपवण्याचे प्रयत्न करून पाहिले. त्यात त्यांना यश आले नाही. राजाच्या द्वारे स्वामींना संपवण्याचा प्रयत्न म्हणून सैनिकही पाठविले. परंतु हे सर्व निष्फळ झाले. श्री चक्रधर स्वामी धिरोदात्तपणे व मनामध्ये कुठलीही कटूता येऊ न देता या सर्व

प्रकाराचा सामना करीत होते. त्यांचे अवतार कार्य प्ाूर्णत्वास आले होते. बेलाप्ाूर येथे त्यांनी आपले शेवटचे निरूपण केले. भक्तीजनांना ऋध्दप्ाूर येथे वास्तव्यास असलेल्या श्रीगोविंदप्रभूंच्या सान्निध्यात राहण्याची आज्ञा दिली. व आम्ही निरूपण केलेले विचार शास्त्र व वचनरूप परमेश्वराचे दास्य करा. आता आम्ही उत्तरापंथी बीजे करीत आहोत. आम्ही सांगितलेल्या असतीपरीचे आचरण करुण देह क्षेपणार्‍या साधकांना आम्ही प्ाुढील जन्मात भेट देऊ असे सांगून श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी निघून गेले.
(संदर्भग्रंथ – लीळाचरित्र, सूत्रपाठ)