जीवरक्षकांचे उपोषण तूर्त मागे

0
233

>> मुख्यमंत्र्यांचे सरकारी सेवेत घेण्याचे आश्‍वासन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जीवरक्षकांनी आपले उपोषण मागे घेतले. म्हापसा येथील गांधी चौकात गेल्या अकरा दिवसांपासून २३० जीवरक्षक उपोषणाला बसले होते. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ऍड. अजितसिंह राणे, स्वाती केरकर, संजय बर्डे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता केली.

यावेळी बोलताना स्वाती केरकर यांनी, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे उपोषण माग घेतले असले तरी सरकारकडून दगाबाजी झाल्यास पुन्हा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा दिला. जीवरक्षकांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यत आम्ही गप्प बसणार नाही. एकही कामगार त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहू नये, यासंदर्भात खबरदारी घेतली जाणार असल्याचे केरकर म्हणाल्या.

ऍड. राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आम्ही २३० जीवरक्षकांची यादी सादर केली आहे. त्या सर्व कामगारांना ‘गोवा मनुष्यबळ विकास महामंडळा’मार्फत सरकारी सेवेत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. शासकीय नियमांनुसार येत्या जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसृत करून त्यानंतर त्या सर्व जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. वास्तविक, आम्ही मागच्या फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारचे आंदोलन केले होते व त्या वेळी विधानसभा अधिवेशन सुरू असताना मोर्चाही काढला होता. तेव्हा त्या जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तथापि, कालांतराने कोविड महामारीमुळे तसेच त्यानंतर गोवा मुक्तिदिन सोहळ्यात राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याने जीवरक्षकांचा प्रश्न प्रलंबित राहिला असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे राणे म्हणाले. हा प्रश्न आता सुटेल असे आम्हाला वाटते असे सांगून राणे यांनी कॉंग्रेस नेते दिगंबर कामत व मंत्री मायकल लोबो यांच्यासह सर्व राजकीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले.