२१, २२ रोजी संपाचा जीवरक्षकांचा निर्णय
समुद्र किनार्यांवरील जीवरक्षकांनी २१ व २२ रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला असला तरी त्यांचा हा संप होऊ नये यासाठी पावले उचलण्याची सूचना आपण पर्यटन संचालक व अन्य अधिकार्यांना केली असल्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी काल सांगितले.सकाळीच आपण याबाबत खात्याचे संचालक व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोललो असून त्याबाबत तोडगा काढण्याची सूचना त्याना केली असल्याचे परुळेकर म्हणाले.
या जीवरक्षकांची भरती पर्यटन खात्याने केलेली नाही. ‘दृष्टी’ या कंपनीला त्या कामाचे कंत्राट देण्यात आलेले आहे व त्यांच्या वेतनासह अन्य बाबी ‘दृष्टी’ ही कंपनीच पाहते आहे. मात्र, तसे असताना आता पर्यटन खात्याने आपणाला सेवेत कायम करावे असा हट्ट या जीवरक्षकांनी धरला आहे. हे ५६८ जीवरक्षक राज्यातील वेगवेगळ्या समुद्रकिनार्यांवर काम करीत असतात. रोज १२ तास काम करावे लागते. तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडणार्यांना वाचवावे लागते.
पण त्यांच्या कामाची कदर केली जात नसल्याचे कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांचे म्हणणे आहे. कामगार संघटनेशी संबंध ठेवल्याबद्दल गेल्या ७ महिन्यात १६ जीवरक्षकांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. या आधी आपल्या मागण्यांसाठी जीवरक्षकांनी तीन ते चार वेळा मोर्चे काढले आहेत. या जीवरक्षकांना ७ ते ८ हजार रु. एवढा पगार दिला जात असून तो २१ हजार रु. एवढा करावा अशी जीवरक्षकांची मागणी आहे.