पणजी शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर प्रकारच्या सामानाची विक्री करणार्या दुकानदारांनी आपली दुकाने येत्या रविवार ९ मे पर्यंत स्वेच्छेने बंद ठेवावीत, तसेच, रेस्टॉरंट मालकांनी रेस्टॉरंटमधील सेवा बंद ठेवून केवळ पार्सल सेवा सुरू ठेवावी, असे आवाहन पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, गोवा चेंबर ऍण्ड कॉमर्सचे अध्यक्ष मनोज काकुलो आणि गोवा हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंटस् असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनात काल केले आहे.
राजधानी पणजीतील कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या १,५७४ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होऊन आरोग्य यंत्रणा तणावाखाली आली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी मोडून काढण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. शहरातील अनेक नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने खुली ठेवण्याची गरज आहे. इतर सामानाची विक्री करणारे बंद ठेवण्याची गरज आहे. नागरिकांनी सुध्दा गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे निवेदनात म्हटले आहे.