जीएसटी चोरीप्रकरणी वेर्णातील दोन कंपनी संचालकांना अटक

0
114

>> गोवा राज्य कर विभागाची कारवाई

जीएसटी चोरी प्रकरणी कारवाई करून मुख्तार ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड वेर्णा या कंपनीच्या दोन संचालकांना गोवा राज्य कर विभागाने अटक केली. मुख्तार शेख आणि महिद शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची दोघांची नावे आहेत.

राज्यात जीएसटी चोरीप्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल २० कोटी ९६ लाख रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोव्यात ही पहिलीच मोठी कारवाई आहे. वेल्हा येथील मुख्तार ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हे दोघे संचालक आहेत. २०१७ पासून त्यांनी जीएसटी चोरी केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्तार शेख व महिद शेख या अटक केलेल्या दोघांनाही प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना सशर्त जामीन देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. व्याज आणि इतर गोष्टी पकडून दोघांनी तब्बल २० कोटी ९६ लाख रुपयांची चोरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोवा गुड्स ऍण्ड सर्व्हिस टॅक्स कायद्याअंतर्गत १३१ (१)(सी) आणि १३२(१)(डी) प्रमाणे या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जीएसटी टॅक्स क्रेडिटमध्ये गोलमाल केल्याचा ठपका या दोघांवरही ठेवण्यात आला आहे. गोवा जीएसटी कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.