पंचायतमंत्री पार्सेकरांची माहिती
उत्तर व दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना करण्यात येणार असल्याचे पंचायत मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. येत्या फेब्रुवारी महिन्यात या निवडणुका होणार असून त्यापूर्वी मतदारसंघांच्या फेररचनेचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सध्या उत्तर गोव्यात ३० व दक्षिण गोव्यात २० मतदारसंघ आहेत. फेररचना करताना दक्षिण गोव्यात २५ व उत्तर गोव्यात २५ मतदारसंघ निर्माण होतील याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे पार्सेकर म्हणाले. शिवाय जिल्हा पंचायतींच्या मतदारसंघांपैकी काही मतदारसंघ हे खूप मोठे तर काही खूप लहान अशी स्थिती आहे. मोठे मतदारसंघ हे सुमारे २० ते २३ हजार मतदारांचे आहेत. तर लहान मतदारसंघ हे केवळ ७-८ हजार मतदारांचे आहेत.
या मतदारसंघांतही एका प्रकारे समतोल येणे गरजेचे आहे व फेररचना करताना त्याचाही विचार करण्यात येणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.