राज्यातील जिल्हा पंचायतींच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीतील मतमोजणी मंगळवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून म्हापसा, मडगाव आणि वास्को येथे तीन ठिकाणी एकाच वेळी केली जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ४६.६६ टक्के मतदान झाले होते.
पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला होता. परिणामी ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली. आता, सर्वांचे निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे.
उत्तर गोव्यातील रेईश मागूश मतदारसंघातील मतमोजणी पेडे-म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलातील बॉक्सिंग सभागृहात केली जाणार आहे.
दक्षिण गोव्यातील दवर्ली मतदारसंघातील मतमोजणी फातोर्डा-मडगाव येथील माथानी सालढाणा प्रशासकीय संकुलातील तळमजल्यावर आणि कुठ्ठाळी मतदारसंघातील मतमोजणी बायणा-वास्को येथील रवींद्र भवनातील पहिल्या मजल्यावरील मिनी सभागृहात केली जाणार आहे.