राज्य सरकारने राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक एका आठवड्याने पुढे ढकलण्याचा निर्णय काल घेतला. आता, जिल्हा पंचायत निवडणूक दि. 20 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. यासंबंधीचा आदेश पंचायत सचिवांनी काल जारी केला.
राज्य सरकारने जिल्हा पंचायत निवडणूक 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्याचे जाहीर केले होते. राज्यातील मतदारयाद्यांच्या पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेला सुरुवात झाल्याने राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी नवीन निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागली. त्यामुळे पूर्वी जाहीर केलेल्या 13 डिसेंबरला निवडणूक घेणे शक्य नव्हते. आता, राज्य सरकारने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दि. 20 डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
आरक्षणाचा तिढा कायम
राज्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघ आरक्षणाचा तिढा कायम आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जिल्हा पंचायत मतदारसंघ आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. यावेळी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने मतदारसंघ आरक्षण प्रश्नी बाजू मांडण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदत मागून घेतली, तोपर्यंत जिल्हा पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही.
जिल्हा पंचायत मतदारसंघ आरक्षणाविरोधातील याचिकांवर येत्या 25 नोव्हेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे. ही सुनावणी होईपर्यंत जिल्हा पंचायत निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता नाही, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल (एजी) देविदास पांगम यांनी दिली. जिल्हा पंचायत मतदारसंघाचे आरक्षण ट्रिपल टेस्टच्या आधारावर करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी सरकार आणि राज्य निवडणूक आयोग याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.

