(क्षणचित्रं… कणचित्रं…)
- – प्रा. रमेश सप्रे
लहानपणातले असे रोमांचकारी जीवनानुभव बदलत्या काळात गडप व्हायला लागलेयत. कारण खेळच काय, सारं अनुभवविश्व-भावविश्व वितीएवढ्या मोबाईलच्या पडद्यावर आलंय. गंमत आहे! परंतु कोणतंही उच्च ध्येय साकारताना हा सोपा नसलेला सोपान चढावा लागतो.
मानवाच्या इतिहासात किंवा संस्कृतीच्या विकासात पहिला जिना केव्हा बांधला गेला असेल? कुणी तो पहिल्यांदा तयार केला असेल? -अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे अवघड असते. तसे ते आवश्यकही नसते. यासंबंधात तर्क मात्र करता येतो. ज्यावेळी एकापेक्षा अधिक मजल्यांची घरे बांधणे सुरू झाले तेव्हा वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना बनवणे आवश्यक बनले.
रामायणात अयोध्या, वानरांची राजधानी किष्किंधा नि सोन्याची लंका या नगरींमध्ये अनेक मजल्यांच्या वास्तूंचा उल्लेख येतो. राजवाडे, महाल यांसाठी मंदिर शब्दाचा वापर केला जातो नि अशी मंदिरे अनेक मजली असतात. म्हणजे अर्थातच जिने असायलाच हवेत. इतकंच कशाला, मोहेंजोदडो- हरप्पा यांच्या उत्खननातून असे जिने म्हणजे एकावर एक बनवलेल्या पायर्या दिसून आल्या. नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठं, बौद्धविकार यांच्या बांधकामात जिन्यांचा वापर अनिवार्य होता.
अगदी गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी अशा नद्यांवर पायर्यांचे बांधलेले भव्य घाट हे एकप्रकारचे जिनेच होते. जसं कोणत्याही दरवाजातून आत-बाहेर येता-जाता येतं, तसंच जिन्यांवरून उतरणं-चढणं असं खाली-वर जाता येतं. काही किल्ल्यांकडे जाणारे पायर्यांचे मार्ग, तसेच उंचावर असलेल्या पुरातन मंदिरापर्यंत पोचण्यासाठी तयार केलेले दगडी पायर्यांसारखे बनवलेले जिने चढताना छाती दडपवतात, तर उतरताना पोटात पोकळी निर्माण करतात. पण त्यांची उपयुक्तता मात्र सर्वमान्य असते. दोन भिन्न पातळ्या जोडण्याचं काम असे जिने करतात.
अगदी आजच्या मॉल-संस्कृतीतही फिरते-सरकते जिने (एस्कलेटर्स) असतातच. यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही खाली येणार्या पायरीवर पाय ठेवला की ती पायरीच विनासायास आपल्याला वर घेऊन जाते. उघड्या लिफ्टसारखी. अर्थात खाली येणार्या नि लगेच वर चाजार्या पायरीवर पाय ठेवताना शक्तीपेक्षा युक्ती नि सवय आवश्यक असते. ज्यांना अशा फिरत्या जिन्यांवर पाऊल ठेवण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी शेजारी साधे जिने असतातच; जसे ते अनेक मजली इमारतीत लिफ्टच्या बाजूला असतात. अशा प्रकारचा एक जिना अगदी सरळ वर चढत जाणारा इमारतीच्या बाहेर असतो. इमर्जन्सी एक्झिट म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीत (उदा. इमारतीला आग लागली, भूकंपामुळे काही भाग कोसळला तर-) स्वतःचा जीव वाचवत जिवावर उदार होऊन खाली उतरण्यासाठी असलेला जिना. इमारतीच्या आतल्या भागात जर अतिरेकी हल्ला, आग यांचं तांडव सुरू असेल तर हा आणीबाणीत उपयोगी पडणारा जिना देवदूत ठरतो. जीवनदान देणारा!
पूर्वी काही घरांना माळे-पोटमाळे (ऍटिक्स) असत. लहान मुलं लपाछपी खेळताना लपण्याच्या उत्साहात वर जायची खरी; पण तिथली ती अंधारमय परिस्थिती पाहून नि आदल्या रात्री ऐकलेल्या भयकथेतील राक्षस किंवा भूत आठवून घाबरून रडू लागायची. त्यामुळे लपून बसण्याचा खेळखंडोबा व्हायचा. मग घरातल्या मोठ्या मंडळींना त्यांना खाली उतरवावं लागायचं. लहानपणातले असे रोमांचकारी जीवनानुभव बदलत्या काळात गडप व्हायला लागलेयत. कारण खेळच काय, सारं अनुभवविश्व-भावविश्व वितीएवढ्या (सहा इंचाच्या) मोबाईलच्या पडद्यावर आलंय. गंमत आहे!
सापशिडीचा खेळ जिने चढण्या-उतरण्यासारखाच आहे. शिडी हा वर नेणारा जिना, तर साप हा गिळून पोटातून शेपटातून खाली उतरवणारा जिनाच की! यातून साप ‘गिळतो’ असा चुकीचा संदेश मिळून ‘दिसला साप की मार’ अशी दुष्ट परंपरा सुरू होते. म्हणून हल्ली ‘सापशिडी’ऐवजी ‘नळ्या आणि शिड्या’ (पाइप्स ऍण्ड लॅडर्स) असं लहान मुलं म्हणतात ते ऐकून बरं वाटतं. असो.
जिन्याला आणखी एक शब्द आहे ‘दादर.’ मुंबईतल्या दादरला ‘दादर’ हे नाव रेल्वे स्टेशनवरील ओव्हर ब्रिजवर पोचवणार्या जिन्यांवरून (दादरांवरून) तर पडलं नसेल? सहज गमतीने म्हटलं.
नवविद्या भक्ती नि मुक्तीचं प्रतीक! भक्तिशास्त्रात एक सुंदर प्रतीक येतं. नऊ पायर्यांचा जिना नि वरची गच्ची (टेरेस). श्रवणं-कीर्तनं-नामस्मरणं… अशा पायर्या चढत नवव्या आत्मनिवेदनानंतर गच्चीवर पोचलं की मुक्तीचाच अनुभव येतो. वरचं असीम आकाश नि भवतीचा विशाल परिसर यामुळे एका मुक्त वातावरणाचा अनुभव.
पूर्वी वक्तृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धेसाठी एक विषय दिला जाई- ‘सोपान मी, सोपा न मी.’ सोपान म्हणजे जिना. हा जिना म्हणतो मला ‘सोपान’ म्हणतात, पण प्रत्यक्ष चढू लागलात तर ‘सोपा न मी’ असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कोणतंही उच्च ध्येय साकार करताना हा सोपा नसलेला सोपान चढावा लागतो.
असाच एक मुक्तिसोपान म्हणजे ज्ञानेश्वरादी चार भावंडं. मुक्तीकडचा प्रवास सुरू केला तर पहिला टप्पा (पहिली पायरी) ‘निवृत्ती’चा असतो. यातून मग ‘ज्ञाना’ची (ज्ञानदेवाची) पायरी चढावी लागते. मुक्तीचा प्रवास तसा आनंददायक असतो नि वर वर चढत जाणारा अनुभव येतो. हाच खरा अनुग्रह असतो. असो.
मुक्तीचा (अखंड शांतीचा, समाधीचा) अनुभव घेण्यासाठी नऊ पायर्यांचा, चार पायर्यांचा असे जिने आहेतच. पण एका (फक्त एकाच) पायरीच्या जिन्याची कल्पना आपण करू शकतो का? तुम्ही म्हणाल, ‘एका पायरीचा आणि जिना?’ हो, आहे ना असा जिना? पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी एकाच पायरीवर पाऊल नाही, आपलं मस्तक ठेवलं की पुरतं. नामदेवाच्या पायरीवर! शून्यातून अनंतात नेणारा हा एका पायरीचा जिना म्हणजे साक्षात नाम-देव! नाम हाच देव! बघा विचार करून.