जामीन रद्दच्या आदेशाला अमित पालेकरांकडून हायकोर्टात आव्हान

0
8

फोंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर बाणास्तारी अपघात प्रकरणातील एक संशयित आणि आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जामीन रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका काल त्यांनी दाखल केली. त्यांच्या आव्हान याचिकेवर बुधवारी सुनावणी घेतली जाणार आहे. आता सर्वांचे लक्ष उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लागले आहे.

फोंडा येथील न्यायालयाने ॲड. अमित पालेकर यांनी जामीन अटींचे उल्लंघन केल्याने त्यांचा जामीन रद्द करण्याचा आदेश सोमवारी दिला होता. पालेकर यांनी चार वेगवेगळ्या प्रसंगी परदेशात जाऊन त्यांच्या जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा युक्तिवाद गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयात केला होता.
बाणास्तारी अपघात प्रकरणातील पुरावे नष्ट करणे, तपासाची दिशाभूल करणे आणि खऱ्या गुन्हेगाराला आश्रय देणे, असे आरोप असलेले पालेकर यांना 2023 मध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता. आता अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या आदेशामुळे ॲड. पालेकर यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक त्यांच्या अटकेसाठी प्रयत्नशील आहे.