जानेवारीपर्यंत १८ वर्षे पूर्ण करणार्‍यांना मतदान हक्क

0
70

१ जानेवारी २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणार्‍या युवकांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळेल. तो मिळावा यासाठीच निवडणूक आयोगाने काल दि. १५ पासून खास मतदार उजळणी सुरू केली असून १४ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू असेल. त्याचप्रमाणे निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वीही मतदार यादीत नावांचा समावेश करण्याची व्यवस्था असेल, असे निवडणूक अधिकार्‍यांनी काल सांगितले. या खास मोहिमेसाठी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

येत्या निवडणुकीत राज्यात किमान ८५ टक्के मतदान होईल, असे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या निवडणुकीच्यावेळी ८३ टक्के मतदान झाले होते, असे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले. राज्यात सद्या १० लाख ८६ हजार ८२ मतदार आहेत. आतापर्यंत १४ हजार ३६५ मतदारांची नावे यादीतून वगळली असून त्यात ४ हजार ८८१ मृत झालेल्यांच्या नावांचा समावेश आहे. विदेशी नागरिकत्व घेतलेल्यांना मतदानाचा अधिकार नाही, सुमारे ९ हजार अर्ज नावे वगळण्यासाठी आले आहेत. नावे वगळण्यात आलेल्यांमध्ये पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्यांचाही समावेश आहे.