जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भाजपचे उमेदवार जाहीर : तेंडुलकर

0
72

भाजप आपल्या उमेदवारांची नावे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, पक्षाने राज्य जाहीरनामा समिती स्थापन केलेली असून उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे या समितीचे निमंत्रक आहेत. तर आपण स्वत: तसेच खासदार नरेंद्र सावईकर, सदानंद शेट तानावडे, दत्तप्रसाद खोलकर, माविन गुदिन्हो, नीलेश काब्राल, प्रमोद सावंत, गणेश गावकर, दामोदर नाईक, प्रकाश वेळीप, अनिल होबळे, संतोष केंकरे, कुंदा चोडणकर व सुलक्षणा सावंत हे या समितीचे सदस्य असल्याचे तेंडुलकर म्हणाले. भाजपचा येत्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा हा लोकाभिमुख असेल, असे तेंडुलकर यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षाचे नेते यापूर्वीच राज्यातील १ लाख ७० हजार लोकांपर्यंत पोहोचले असल्याचे तेंडुलकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही घेतलेले काही निर्णय जर लोकांना आवडलेले नसतील तर ते आम्ही मागे घेणार असल्याचे पत्रकारांनी त्यांना कूळ-मुंडकार दुरुस्तीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले.

 कॉंग्रेसचे उमेदवार १० पासून जाहीर
कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार १० जानेवारीपासून जाहीर करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी काल सांगितले. पक्षाच्या उमेदवार छाननी समितीची बैठक काल येथे दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पुढील बैठक येत्या ४ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. यंदा पक्ष काही नवे चेहरे व युवा नेत्यांना उमेदवारी देणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.