जागतिक ग्राहक हक्क दिवस

0
475
  • प्रा. नागेश सु. सरदेसाई

आजच्या डिजिटल युगात ग्राहक आणि वस्तू यांच्यामध्ये एक नाते असते. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांनी ग्राहकांच्या आवडीनिवडींचा विचार करून, तसेच वस्तूंचा गुणात्मक दर्जा वाढवून ग्राहकांमध्ये एक आत्मबळ निर्माण करावे जेणेकरून ग्राहकाचा वस्तूवरील विश्‍वास अतूट राहील आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व त्या दृष्टीने वाढेल.

दर वर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्‍या हलगर्जीपणामुळे, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉन केनेडी यांनी औपचारिकपणे अमेरिकी कॉंग्रेस (संसद)ला एक संदेश १५ मार्च १९६२ रोजी पाठवून या विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली होती. केनेडी हे जगातले पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी ग्राहक हक्काच्या विषयाला महत्त्व दिले होते. म्हणून १९८३ सालापासून ग्राहक मंचाने (चळवळ) १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्याचा निश्‍चय केला. गेल्या कित्येक वर्षांपासून, ग्राहक हक्कांविषयी लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी, वेगवेगळे मुद्दे घेऊन हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ग्राहकांच्या वेगवेगळ्या तक्रारी व सूचना समजून घेऊन त्यांचा सर्व आंतरराष्ट्रीय बाजार संघटना तसेच सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी उपयोग केला जातो.

दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिवस एक घोषणा घेऊन साजरा करण्यात येतो. या वर्षीची घोषणा आहे – ‘द सस्टेनेबल कंझ्युमर’- समाधानकारक ग्राहक. आजच्या युगात जर आपण बारकाईने पाहिले तर आपल्याला असे दिसून येते की आज जागतिक स्तरावर हवामान बदलांमुळे मोठ्या प्रमाणात उलटफेरी होतात. यावर्षी ग्राहक संस्थांनी एकत्र येऊन एक मोठा बदल आणण्याचा संकेत दिला आहे. या गोष्टीचा एकमेव उद्देश म्हणजे पर्यावरणाचा सांभाळ करणे. आज आपण पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पर्यावरणाचा समतोल बिघडताना पाहतो. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान बदल आणि जैवविविधतेचे नुकसान होतानाही आपण पाहतो. २०२० या दशकात मनुष्याला शेवटची संधी आहे, असे म्हणतात. आज हवामान दिवसेंदिवस १.५ डीग्री सेंटीग्रेडने वाढते आहे आणि औद्योगिक पातळीवर ग्राहक चळवळीच्या घोषणेचा उद्देश असफल होताना आम्हाला पाहायला मिळते. या अनुषंगाने समाजात माणसाच्या जीवनशैलीत बदल करणे आणि सरकारने त्याला अनुसरून विविध पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे या गोष्टींचा समावेश ग्राहक चळवळीने यात केला आहे. आज जागतिक स्तरावर आपण पाहिलं तर कन्झम्शन म्हणजेच वापर किंवा उपभोग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला दिसतो.

– एक दशलक्ष प्लास्टिक बॉटल्स जगात एका मिनिटाला विकल्या जातात. त्यांचेच पाच ट्रिलियन प्लास्टिकचे तुकडे समुद्रामध्ये वाहताना आपल्याला दिसतात. इतक्या बॉटल्स खरेदी करण्याची गरज असते का?
कारण दिवसाचे १२ ते १८ तास आपण कामानिमित्त घराबाहेर असतो व तेवढ्या प्रमाणात पाणी जवळ बाळगणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपण सहज पाण्याची बॉटल खरेदी करतो आणि ती संपली की बाहेर उडवून देतो.

– दर वर्षाला ८० बिलियन नवीन कपडे आम्ही खरेदी करतो. आज कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या पायांवर उभी असते, पैसा कमावते. त्यासाठी ती सतत बाहेरच्या जगात तिला वावरावे लागते, चार लोकांत तिचे उठणे-बसणे असते. त्यामुळे साहजिकच उत्तम कपड्यांचा वापर करणे ही तिची गरज आणि हौस दोन्हीही बनून जाते आणि मग कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता किंवा आज आपण जे कपडे खरेदी करतो आहोत त्यांची आपल्याला खरंच गरज आहे का याचा विचार न करता आपण बेहिशोबी कपडे खरेदी करतो.
– त्याचप्रमाणे ३.९ बिलियन अन्नपदार्थांचे आम्ही सेवन करतो – यामधील एक तृतीयांश पदार्थ वाया जातात हेही आपण पाहतो. आता हे अन्न वाया का जाते? कारण एक म्हणजे वेळेची सबब सांगून आपण वेळी-अवेळी, भूक नसताना, घराबाहेर हॉटेल्समध्ये आणि पार्ट्यांच्या नादात अन्नाचे सेवन करत असतो. त्यामुळे बर्‍याचदा आपण एकदाच खूप सारे पदार्थ मागवून घेतो पण प्रत्यक्ष खाताना आपण ते संपवू शकत नाही. किंवा एखाद्या पदार्थाची चव आपल्याला आवडत नाही म्हणून तो पदार्थ आपण तसाच टाकून देतो. तर अशाप्रकारे बदललेल्या या जीवनशैलीचा परिणाम म्हणून आज हवामानात आमुलाग्र बदल झालेला आपल्याला जाणवतो.
जागतिक स्तरावर ग्राहक आज आपल्या तक्रारी घेऊन रस्त्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतात. ग्राहक विचार मंचातर्फे उद्योग क्षेत्र तसेच सरकारी क्षेत्र यांमध्ये योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवड्यात २६ आंतरराष्ट्रीय ग्राहक सदस्य ‘ग्रीन ऍक्शन वीक (आठवडा)’ साजरा करून वेगवेगळ्या विषयांसंबंधात जागृती घडवून आणण्यात प्रयत्नशील आहेत. त्यात अन्नाची नासाडी, हवेचे प्रदूषण हे विषय प्रामुख्याने हाताळण्यात येणार आहेत. तसेच या कार्यात समाजातील वेगवेगळ्या घटकांची तसेच सरकार दरबारीसुद्धा काही मदत मिळण्याची आशा आहे.

१५ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यामागील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणे ही काळाची गरज आहे हे आम्ही सर्वजण मान्य करतो. मग या वर्षीच्या घोषवाक्याकडे बारकाईने नजर फिरवली तर आपल्याला कळेल की ‘‘ग्राहक’’ हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे आणि ‘सस्टेनेबल कन्झम्प्शन’ करण्यासाठी म्हणजेच समाधानकारक ग्राहक बनण्यासाठी आम्ही पाच सूत्रांचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे. सर्वांत प्रथम म्हणजे ग्राहकांची मागणी आहे की त्यांना समाधानकारक माहितीची फार आवश्यकता आहे. त्यांना उपयुक्त माहिती शिक्षणाद्वारे मिळवून देणे ही एक गरजेची बाब आहे. अपुरी किंवा चुकीची माहिती ग्राहकाचा विश्‍वास संपादन करण्यास असमर्थ ठरेल. व्यापारी संघटनांनी व्यापारासंदर्भात योग्य माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

दुसरा मंत्र म्हणजे आज हवेतील कार्बन प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याची गरज आहे. २०३० सालापर्यंत त्या अनुषंगाने प्रगती होण्याची आशा करायला हरकत नाही.
तिसरा मंत्र आहे की आज वस्तुंच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. आजच्या नव्या युगात तरुणांमध्ये ही पारदर्शकता आणून एक नवा ग्राहक तयार करणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी ऑनलाईन वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी सावधानता बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकाने ग्राहक न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी.

चौथा मंत्र म्हणजे वस्तूंचे योग्यरीत्या पॅकेजिंग करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्लास्टिकचा उपयोग न करता किंवा कमीत कमी प्रमाणात करून, अन्य इतर घटकांचा उपयोग करून वस्तू पॅक करणे गरजेचे आहे.

पाचवा मंत्र म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर एका अशा नवीन वस्तूची निर्मिती करणे ज्या सर्वसामान्य माणसांना खरेदी करण्यासाठी योग्य असतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वस्तु निर्मित करून त्या संपूर्ण पृथ्वीवरील ग्राहकांसमोर ठेवणे आणि त्याचा उत्तम दर्जा कायम ठेवणे किंवा वाढवून देणे हा पाचवा मंत्र आहे.

आजच्या डिजिटल युगात ग्राहक आणि वस्तू यांच्यामध्ये एक नाते असते. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ग्राहकांच्या आवडीनिवडींचा विचार करून, तसेच वस्तूंचा गुणात्मक दर्जा वाढवून ग्राहकांमध्ये एक आत्मबळ निर्माण करावे जेणेकरून ग्राहकाचा वस्तूवरील विश्‍वास अतूट राहील आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व त्या दृष्टीने वाढेल. आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवसाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा देताना ग्राहक हा राजा आहे, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी वठवावी अशी सर्वांना विनंती आहे. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण अनेकदा एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा; अमुक खरेदीवर सोनेचांदीचे नाणे मोफत मिळेल; चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षिसे जिंका; भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल… अशा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहकांनो वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता, ही तीच वस्तू असल्याचं नीट पारखून घ्या. आता रे रा कायदाही अमलात आला आहे. जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणं गरजेचं आहे. थोडक्यात ग्राहक क्रांती ही काळाची गरज आहे.