रजनीची राजकीय उडी

0
174

तमिळी थलायवा, अभिनेता रजनीकांत यांनी काल आपल्या भावी राजकीय वाटचालीसंदर्भातले ‘व्हीजन’ चाहत्यांसमोर ठेवले. दक्षिणेत राजकारण आणि सिनेमा हातात हात घालून वावरतात. अगदी एम. जी. रामचंद्रन यांच्यापासून विजयकांत, शिवाजी गणेशन, एम. करुणानिधी आणि जे. जयललितांपर्यंत तामीळनाडूमध्ये सिनेमा आणि राजकारण यांचा घनिष्ठ संबंध राहिला. सिनेमा क्षेत्रातील लोकप्रियतेच्या जोरावर राजकारणात पावले टाकण्याची ही परंपरा आज एकीकडे रजनीकांत आणि दुसरीकडे कमल हसन चालवू पाहात आहेत. रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याचा विचार बोलून दाखवला होता त्याला दोन वर्षे केव्हाच उलटून गेली. ‘बदलाची वेळ आलेली आहे आणि मी आज निर्णय घेतला नाही तर अपराधी ठरेन’ असे सांगत त्यांनी तामीळनाडूत राजकीय व्यवस्था परिवर्तनाची ग्वाही दिलेली होती, परंतु दोन वर्षे उलटली तरी अजूनही या पक्षाचे ना नाव निश्‍चित झाले आहे, ना झेंडा, ना अजेंडा, परंतु त्याबाबत संपूर्ण देशामध्ये प्रचंड कुतूहल मात्र निश्‍चितच आहे. रजनीकांत आजवर राजकीय भूमिका स्वीकारण्यास कधीच कचरलेले नाहीत. एकदा तर जयललितांना मते देऊ नका असे सांगत त्यांनी द्रमुकला पाठिंबा दिलेला होता.पीएमकेने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे आणल्याने त्या पक्षाविरुद्ध त्यांनी जाहीर वक्तव्ये केली होती. परंतु प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याचा निर्णय घेण्यास त्यांना वेळ लागला. हा निर्णय घेतल्यावरही पुढील पावले ते मोजूम मापूनच टाकताना दिसत आहेत. तामीळनाडूमध्ये जनतेला प्रतिमापूजनात मोठा रस आहे. रजनीकांत यांच्या भोवती आज जे वलय ाहे, त्याला त्यांची चित्रपटांतील उत्तुंग प्रतिमाच कारणीभूत आहे. तामीळनाडूमध्ये पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक व्हायची आहे. राज्याच्या राजकारणातील दोन मोठी व्यक्तिमत्त्वे जयललिता आणि करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची मोठी पोकळी तेथे निर्माण झालेली आहे. ही पोकळी भरून काढण्याचे स्वप्न रजनीकांत पाहात आहेत. सिनेमा क्षेत्रातील आपल्या लोकप्रियतेच्या आधारे आपण ही पोकळी भरून काढू असा विश्वास त्यांना वाटत असावा. तामीळनाडूच्या राजकारणाचे पारडे आजवर द्रमुक आणि अभाअद्रमुक या दोन टोकांवर वरखाली होत राहिले. भारतीय जनता पक्ष दक्षिण दिग्विजयाचे स्वप्न केव्हापासून पाहात आहे आणि त्यासाठी त्याला तामीळनाडूमध्ये विश्वासू साथीदाराची आवश्यकता आहे. जयललितांच्या मृत्यूनंतर दोन शकले झालेल्या अभाअद्रमुकला एकत्र आणण्याचे प्रयत्न मोदींनी केले होते. ओ. पनीरसेल्वन आणि ई. पलनीस्वामी यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मग शशिकला गटाला दूर ठेवण्यासाठी दोन्ही गटांत दिलजमाई घडवण्यात मोदींची महत्त्वाची भूमिका होती. रजनीकांत याची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या या नव्या पक्षाला सोबतीला घेण्यास भाजप उत्सुक आहे. रजनीकांत यांनीही या हातमिळवणीसंदर्भात सकारात्मक भूमिकाच स्वीकारलेली दिसते आहे. मोदी – शहांना कृष्ण आणि अर्जुनाची उपमा देणार्‍या रजनीकांत यांना तामीळनाडूमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राजकारण हे खरे तर दलदलीसारखे असते. त्यात रुतण्याचीच शक्यता अधिक असते. नुकताच पेरियार यांच्यासंदर्भात रजनीकांत यांनी केलेल्या टीकेचे चटके नुकतेच त्यांना सोसावे लागले आहेत. परंतु आपल्याला तामीळनाडूच्या राजकारणात बदल घडवायचा आहे असे ते म्हणत आहेत. स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे नाही. शिक्षित आणि तरुण नेत्याकडे आपण राज्याची सत्तासूत्रे सोपवू इच्छितो असेही त्यांनी काल सांगितले. खरे तर हा सगळा जर – तरचा विषय आहे. विधानसभा निवडणुकीत जर मतदारांनी त्यांच्या प्रस्तावित राजकीय पक्षाला त्यांच्या चित्रपटांप्रमाणे डोक्यावर घेतले आणि हाती सत्ता आली तरच हे स्वप्न साकारू शकते. कमल हसन यांनीही राजकारणात पावले टाकायला सुरूवात केली, परंतु त्यांच्या पदरी अपयशच आलेले आहे. त्यांचा ‘मक्कल निधी मय्यम’ स्थापन होऊन दोन वर्षे झाली, परंतु पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली विजेरी अजून पेटलेली दिसत नाही. तामीळनाडू आणि पुडुचेरीत लढवलेल्या लोकसभा निवडणुकांत एकही जागा जिंकता आली तर नाहीच, जेमतेम तीन ते चार टक्के मतेच त्यांच्या झोळीत पडली. आता रजनीकांत यांची पाळी आहे. सध्या त्या वयाच्या सत्तरीजवळ पोहोचलेले आहेत, परंतु या उतारवयात राजकीय पक्षाचा घाट घातला आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागा लढवण्याची घोषणा त्यांनी कधीपासून करून ठेवलेली आहे. त्यासाठी पैसा, इतर संसाधने, संघटनात्मक बळ, कार्यकर्ते हे सगळे गोळा करण्यासाठी वेळ लागणारच, परंतु एकवेळ हे सगळे मिळवता येईल, परंतु या सार्‍यातून जे काही बदलाचे स्वप्न ते पाहात आहेत ते साकारणे मात्र अतिशय अवघड आहे. राजकारणाच्या दलदलीत उतरण्याचा हा त्यांचा प्रयत्न कितपत सफल ठरतो हे काळ सांगेलच. राजकारण प्रवेश हे युद्ध आहे असे ते म्हणाले. युद्ध हे जीवघेणे असते याचा विसर त्यांना न पडो!