जागतिक कीर्तीचे संतूरवाद पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन

0
18

जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा (८४) यांचे काल निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. संतूर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

१९५६ साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याला संगीत दिले होते. १९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया आणि ब्रिजभूषण काब्रा यांच्यासमवेत प्रसिद्ध केलेली ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही ध्वनिमुद्रिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. हरिप्रसाद चौरासिया यांच्या साथीने पं. शर्मा यांनी शिव-हरी या नावाने चित्रपटांना संगीत देण्यास सुरुवात केली. १९८० साली या जोडीने सिलसिला या चित्रपटाला संगीत दिले. त्यानंतर त्यांनी, फासले (१९८५), चांदनी (१९८९), लम्हे (१९९१), डर (१९९३) अशा चित्रपटांना संगीत दिले आहे.

पं. शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना १९८५ मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राष्ट्राची मानद नागरिकतासुद्धा मिळाली आहे. त्यांना १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ साली पद्मश्री, तसेच २००१ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी पं. शिवकुमार यांना सन्मानित करण्यात आले होते.

पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ मध्ये झाला. ते मूळचे जम्मू येथील रहिवाशी. त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला सुरुवात केली होती. संतूर वादन करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली. आईच्या इच्छेनुसार, त्यांनी संतूर वादनास वयाच्या तेराव्या वर्षापासून शिकण्यास सुरुवात केली. तर पहिले सादरीकरण १९५५ मध्ये मुंबईत केले.

सांस्कृतिक जगाचे नुकसान ः मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मोदींनी या संदर्भात ट्वीट करत पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने आपल्या सांस्कृतिक जगाचे नुकसान झाले आहे. पं.शर्मा यांनी त्यांनी संतूर वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणार्‍या पिढ्यांना भुरळ घालत राहील अशी श्रद्धांजली वाहिली आहे.