जांबावली गुलालोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती

0
357
श्री देव दामोदराच्या पालखीवर गुलाल उधळताना भाविक. (छाया : गणादीप शेल्डेकर)

मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे जांबावली येथील श्री दामोदर संस्थानातील सुप्रसिद्ध गुलालोत्सव काल हजारो भाविकांनी उत्साहात साजरा केला. दुपारी तीन वाजता श्री रामनाथ देवस्थानाच्या प्राकारात पालखीत विराजमान असलेल्या श्री दामोदर देवाला गुलाल अर्पण केल्यानंतर क्षणार्धात गुलाल उधळण्यास सुरवात झाली आणि काही वेळातच आसमंत गुलालाच्या लाल रंगात लालेलाल झाला.दुपारी अन्नसंतपर्णाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला व गुलालात न्हावून गेले. श्री रामनाथाच्या प्राकारात सुवारी वादन, ढोलताशांचा तालावर नृत्य, श्री दामोदराच्या जयघोषाने प्राकार दुमदुमून गेला होता. बालवृद्धासह सर्वजण मनसोक्तपणे गुलालाचा आनंद लुटताना दिसत होते. मठग्रामस्थ हिंदू सभेने उभारलेल्या स्वागताच्या कमानींनी, विजेच्या दिव्यांच्या रोषणाईने तो प्राकार खुलून दिसत होता. या प्रसिद्ध गुलालाला मडगावकर सकाळपासून जांबावली येथे उपस्थित होते. गोवा व गोव्याबाहेरील हजारो भाविक दुपारी दोन वाजता दाखल झाले होते. मडगावची बाजारपेठ दुपारनंतर बंद होती. या गुलालोत्सवाला सर्वधर्माचे लोक एकतेने नांदताना दिसत होते.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने कालपासून उपस्थित होते. गुलालानंतर असंख्य लोकांनी कुशावती नदीच्या पात्रात स्थान केले तर सायंकाळी उशिरा श्री दामोदराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
रात्रौ ‘नवरदेवाची वरात’ हा लोकनाट्याचा कार्यक्रम, त्यानंतर भजनाच्या कार्यक्रमाने सांगता झाली. उद्या सकाळी धुळवड होणार आहे. मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक व पदाधिकारी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवडाभर तेथे ठाण मांडून होते.